चित्रपटसृष्टीतील ‘आधुनिक विश्वकर्मा’ हरपला ; जगविख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे निधन

191

चित्रपटसृष्टीत ‘आधुनिक विश्वकर्मा’ म्हणून ओळखले जाणारे नितीन चंद्रकांत देसाई यांनी नुकतीच त्यांनीच उभारलेल्या कर्जत येथील ‘एनडी’ स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे समजते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आता अनेकांना उमाळे येत असले तरी त्यांच्या या ‘आत्मघातकी’ निर्णयाला चित्रपटसृष्टी, तसेच मराठी जनता आणि राज्यसरकारही तेवढेच जबाबदार आहे असे वाटते. एक मराठी माणूस मोठ्या कल्पकतेने हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म स्टुडिओ’ च्या धर्तीवर कर्जत येथे भव्य स्टुडिओ उभारतो. मात्र त्याला लोकाश्रय आणि राजाश्रयासह चित्रपटसृष्टीचाही ‘आश्रय’ मिळत नाही ही महाराष्ट्राच्या दृष्टीने शोकांतिका आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पुण्यातील काही पत्रकारांना त्यांनी ‘एनडी’ स्टुडिओ पाहण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांच्या महान स्वप्नातून साकारलेल्या ‘मायानगरी’चे प्रत्यक्ष दर्शनही घडले होते. या मायानगरीवर त्यावेळी लिहिलेला हा लेख येथे पुनःप्रकाशित करीत आहे. ……

आधुनिक विश्वकर्म्याने उभारलेली ‘मोहनगरी’
—————————————————-
” जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने आपण खोपोलीकडून कर्जतच्या दिशेने जात असताना काही अंतरावर डावीकडे असलेल्या फायबरच्या मोठमोठ्या कलाकृती आपले लक्ष हमखास वेधून घेतात. चित्रपटसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांच्या या कलाकृती पाहिल्या की क्षणभर आपणास तेथे थांबावेसेच वाटते. कुतुहुलापोटी आपण थांबलो की, हाच तो प्रसिद्ध ‘एनडी’ फिल्म स्टुडिओ असल्याची खात्री पटते आणि आतमध्ये प्रवेश करून कधी एकदा आपण या मोहमयी दुनियेची सफर करतो असे होऊन जाते. प्रत्यक्षात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठमोठे हत्ती सोंडेत माळ घेऊन आपल्या स्वागताला उपस्थित आहेत असे दृश्य दिसते आणि सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेली ही ‘मायानगरी’ पाहून आपण थक्क होऊन जातो.
चित्रपट विश्वात नितीन चंद्रकांत देसाई हे ‘आधुनिक विश्वकर्मा’ म्हणून ओळखले जातात. एक उत्कृष्ट कला-दिग्दर्शक म्हणून केवळ भारतात नव्हे तर परदेशातही त्यांची ख्याती आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’ या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेच्या कलादिग्दर्शनापासून ते अगदी अलिकडील काळात त्यांनीच निर्मित केलेल्या ‘अजिंठा’, ‘बालगंधर्व’ या मराठी चित्रपटाच्या कलादिग्दर्शनापर्यंत नितीन चंद्रकांत देसाई यांनी कलेच्या प्रांतात केलेला द्रुतगती प्रवास थक्क करणारा आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत झालेल्या भाजपच्या प्रचंड मोठ्या प्रचारसभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांना दृश्य स्वरूपात कमळांच्या उगवत्या फुलांमधून प्रकट करणारे हेच ते नितीन देसाई. त्यासाठी त्यांनी त्यावेळी दाखविलेले कलेचे मनोहारी रूप कसे दृष्टे होते ते त्याच लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभर मिळविलेल्या घवघवीत यशावरून लक्षात येते. आणि नंतरच्या निवडणुकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ‘कमळ’ देशभर फुलले. आपल्या कलेमधून हे कमळ फुलून वर येण्याचा ‘श्रीगणेशा’ मात्र नितीन देसाई यांनी मुंबईतल्या त्या प्रचारसभेत आधीच केला होता हे कोणालाच विसरता येणार नाही. त्यामुळे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन देसाई यांची घट्ट मैत्री आहे. या मैत्रीप्रेमापोटीच नरेन्द्र मोदी यांनी स्वतः गुजरातमधील सुमारे ५०० एकर जमीन नितीन देसाई यांना खास फिल्म स्टुडिओ उभारण्यासाठी देऊ केली होती मात्र नितीन देसाई यांचे मराठी प्रेम आणि मराठी बाणा सर्वश्रुत असल्यामुळे त्यांनी कर्जत जवळील जागेतच हा फिल्म स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दहा-पंधरा वर्षात अथक परिश्रम करून अवघ्या पन्नास एकर जागेत एक भव्य-दिव्य फिल्म स्टुडिओ उभारण्याचे आपले एक स्वप्न साकार केले.
चित्रपट आणि स्टुडिओ यांचे अतूट नाते आहे. बाह्यचित्रीकरण वगळता असंख्य चित्रपट हे ‘स्टुडिओ’तच तयार होतात. स्टुडिओतील यंत्रसामुग्रीचा विचार करता हॉलिवूडमधील स्टुडिओज अति भव्य आणि सुसज्ज असतात. भारतातही हैदराबाद येथे ‘रामोजी सिटी’ नावाची प्रचंड मोठी फिल्म सिटी आहे. जी पाहायला दोन-तीन दिवसही पुरत नाहीत. महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आद्य ‘चित्रनगरी’ होती परंतु काळाच्या ओघात ती नामशेष झाली. मुंबईतही अनेक छोटे-मोठे फिल्म स्टुडिओज आहेत मात्र आता त्यांनाही घरघर लागली आहे. चेंबूर येथील ‘आर.के.’ सारखे स्टुडिओ केवळ पैशांवर डोळा ठेवून जमीनदोस्त केले जात आहेत. नाही म्हणायला गोरेगाव येथे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली ‘चित्रनगरी’ आहे. तेथे मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण चालू असते. तरीही चित्रपटनिर्मितीसाठी महाराष्ट्रात आणखी एक प्रचंड मोठा आणि परिपूर्ण स्टुडिओ असावा अशी कल्पना नितीन देसाई यांच्या मनात एके दिवशी आली आणि त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी अक्षरशः जीवाचे रान करून कर्जत जवळ ‘एनडी स्टुडिओ’ची उभारणी केली. ‘एनडी स्टुडिओ’चे सध्याचे स्वरूप पाहता देसाई यांनी या स्टुडिओच्या उभारणीसाठी किती मोठी मेहनत घेतली आहे याची प्रचिती येते.
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून स्टुडिओत साकार झालेले हे ‘बॉलीवूड थीमपार्क’ भव्यदिव्य ‘फिल्मीदुनिया’ ठरली असून, केवळ हिंदी किंवा मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास या स्टुडिओत अनुभवता येणार आहे. या स्टुडिओचा फेरफटका मारताना सुरुवातीलाच डाव्या बाजूला असलेल्या रंगी-बेरंगी भिंती तुमचे लक्ष वेधून घेतात आणि या भिंतीवरील पोस्टर्स पाहताना तुमचाही नकळत भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश होतो. कारण ही सर्व सिनेमा पोस्टर्स जुन्या-नव्या गाजलेल्या चित्रपटांची आहेत. तेथे ‘देविकाराणी’ पासून श्रीदेवी पर्यंत आणि दिलीपकुमारपासून सलमान खान पर्यंत, त्यांनी अभिनित केलेल्या अनेकविध चित्रपटांची पोस्टर्स तुम्हाला पाहायला मिळतात तसेच तुम्ही आणखी पुढे गेला तर तुमचे स्वागत करायला जसा ‘शोले’ तील लाईव्ह ‘गब्बरसिंग’ असतो तसेच त्याच्याबरोबर लाईव्ह ‘बसंती’ही असते. स्टुडिओत खास उभारण्यात आलेल्या ‘शीशमहल’ मध्ये तुमचे स्वागत लाईव्ह ‘अनारकली’ ने केले तर तुम्हाला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. या स्टुडिओत जसा दिल्लीतील कॅनॉट प्लेस आहे तशीच अनेक चित्रपटांत दिसणारी ‘सेंट्रल जेल’ आणि ‘चोरबाजार’ही आहे. या चोरबाजारात तुम्हाला सर्व प्रकारच्या जुन्या वस्तू दिसतील आणि तुमचे मन आपोआपच भूतकाळात जाईल. ‘ट्राफिक सिग्नल’ चित्रपटातील रस्ता असो वा देवदास सिनेमातील भव्य हवेली असो, ऐतिहासिक चित्रपटासाठी उभारण्यात आलेले राजवाडे, गड-किल्ल्यांचे सेट्स तसेच आलिशान बंगले हे सारे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अप्रतिम कलादिग्दर्शनाची साक्ष देतात. या स्टुडिओचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्टुडिओतील वास्तव्यात रसिकांना ‘फिल्मी दुनिया’ अक्षरशः जगता येणार आहे. ‘तलवारी’, ‘चिलखत’, ,शिरस्त्राण’, पाहून तुम्हालाही लढण्याची नक्कीच खुमखुमी येईल आणि ती जिरविण्यासाठी तुम्ही ‘सलीम’, ‘अकबर’ किंवा ‘बाजीराव’ बनण्याची तुमची हौस तुम्ही भागवू शकता. चित्रपटातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभागी होता येते. हृतिक रोशन-ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण येथेच एका किल्ल्यात झाले होते. तसेच सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पाओ’ चे चित्रीकरण ज्या महालात झाले तो सुंदर आणि आकर्षक महाल पाहून तुम्ही सुद्धा त्या महालात आल्यानंतर त्या चित्रपटातील गाणे हमखास गुणगुणणार अशीच ती भव्यदिव्य वस्तू आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्यांचे सिनेमे, त्यांचे संवाद आणि अॅक्शन चित्रपट रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. .
या स्टुडिओत उदयोन्मुख कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उभारले जाणार असून, याची दखल बॉलीवूडचे दिग्गज दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून घेतली जाणार आहे. फिल्मी डान्स, सिंगिंग, कॉमेडी आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारखे टेलेंट शो देखील यात असून, फिल्मोत्सवातील प्रत्येक सेक्शनमध्ये होणाऱ्या लाईव्ह प्रात्यक्षिकांमध्ये सिनेरसिकांना सहभागी होता येणार आहे. पडद्यामागील तांत्रिक कामांचा देखील यात समावेश असून, फिल्म मेकिंग, छायाचित्रण, संकलन अशा सर्व गोष्टींचा अनुभवदेखील घेता येणार आहे. कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडून येणार असून, फिल्मी परेडचा रोमांचदेखील प्रेक्षकांना अनुभवता येईल. एव्हढेच नव्हे तर रोमहर्षक अशी फिल्मीजत्रा लोकांसाठी सादर करण्याचा प्रयत्नही या स्टुडिओमध्ये केला जाणार आहे.
या अत्याधुनिक स्टुडिओबाबत बोलताना, नितीन चंद्रकांत देसाई यांनी असे सांगितले की. ‘नागरिकांना सतत काहीतरी नवीन देण्याच्या मी विचारात असतो, याच विचारातून ‘बॉलीवूड थीमपार्क’ची संकल्पना पुढे आली. लोकांना ही चंदेरी सिनेसृष्टी वास्तव्यात जगता येईल, असा प्रयत्न या उपक्रमाद्वारे आम्ही करीत आहोत. तसेच हे थीम पार्क तीन टप्प्यांमध्ये खुले केले जाणार आहे. सध्या नागरिकांसाठी पहिला टप्पाच खुला करण्यात आला आहे. तसेच, ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या थीमपार्कमध्ये हॉलीवूडची दुनियादेखील वसवण्याचा माझा मानस असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल’ थोडक्यात काय तर, आतापर्यत ‘थ्रीडी’ आणि ‘फोरडी’चा अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांना एन. डी. स्टुडीयोत लवकरच तंत्रज्ञानाच्या आधारे ‘नाईन डी’ चा थरार बसल्याठिकाणी अनुभवता येणार आहे.
असा हा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा शृंगार ल्यालेला एन. डी. स्टुडियो नितीन चंद्रकांत देसाई यांची ‘फिल्मी दुनिया’ म्हणून ओळखली जाणार आहे. ही फिल्मी दुनिया सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. शिवाय मनोरंजनपर विविध कार्यक्रम देखील स्टुडियोत होणार असल्यामुळे या स्टुडिओला दिलेली भेट अविस्मरणीय ठरणार आहे. ही ‘मोहनगरी’ आबालवृद्धांना एका महाउत्सवाप्रमाणेच आनंद देते यात मुळीच शंका नाही.
—- श्रीकांत ना. कुलकर्णी
संपर्कध्वनी — ९४२२३१९१४३