माजी सैनिकांची भव्य मेळावा – ‘सन्मान एवम समाधान’ चे पुणे येथे 15 – 16 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजन

59

पीआयबी पुणे,

पुणे येथे 15 – 16 फेब्रुवारी 2024 रोजी दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘सम्मान एवम् समाधान’ या संकल्पनेवर आधारित या रॅलीचा उद्देश माजी सैनिकांच्या प्रश्नांबाबत जागृती करणे हा आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता पुणे कॅम्प परिसरातील मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या मेळाव्याचा प्रारंभ होईल. हा कार्यक्रम 16 फेब्रुवारी रोजी देखील सुरू राहील. पुण्यातील या कार्यक्रमात सुमारे 3000 माजी सैनिक प्रत्यक्ष उपस्थित राहतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ राज्यांतील 20 केंद्रावरून आणखी 40,000 माजी सैनिक ऑनलाइन पद्धतीने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

लेफ्टनंट जनरल ए के सिंह , पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम आर्मी कमांडर, दक्षिण कमांड हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी, माजी सैनिकांच्या माता आणि माजी सैनिकांचे पिता यांना निवृत्तीवेतन, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), सीएसडी कॅन्टीन आणि इतर संबंधित बाबींसंदर्भात मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. लष्कराच्या मुख्यालयातील उल्लेखनीय उपस्थितांमध्ये माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), सैन्य कल्याण गृहनिर्माण संस्था (AWHO), सैनिक कल्याण विभाग (DSW), एडब्ल्युपीएन, पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रेकॉर्ड ऑफिसेस, आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन, PCDA(O) आणि PCDA पेन्शन प्रयागराज यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

या कार्यक्रमात स्पर्श, निवृत्तीवेतन, ओआरओपी, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, कॅन्टीन इत्यादींशी संबंधित चर्चेसाठी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी दक्षिण महाराष्ट्र मुख्यालय आणि गोवा उपक्षेत्र हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
***