चोखंदळ भूमिकेचा अमित्रियान पाटील

819

अनिल चौधरी, पुणे :-                                                                                                                         ‘सत्या 2’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘मन्या दि वंडरबॉय’ आणि ‘बॉईज २’ यासारख्या मोजक्या पण गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांतून महत्त्वाच्या भूमिका करत आपल्या अभिनयकौशल्याची छाप पाडणारा देखणा अभिनेता अमित्रियान पाटील ‘आसूड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चोखंदळ दृष्टिकोनामुळे अमित्रियानने आतापर्यंत केलेल्या प्रत्येक चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडून गेली आहे. ‘प्रमुख किंवा मध्यवर्ती भूमिकेचा अट्टाहास करण्यापेक्षा, भूमिका सहाय्यक जरी असली तरी अल्पावधीत भाव खाऊन जाईल अशी असावी, असे त्याचे मत आहे, आणि त्याने ते वेळोवेळी सिद्ध देखील केले आहे. राम गोपाल वर्माच्या ‘सत्या २’ सिनेमातील त्याची ‘नारा’ हि भूमिका असो वा सचिन कुंडलकरांच्या ‘राजवाडे अँड सन्स’ मधील त्याने साकारलेली एनआरआयची भूमिका असो, अमित्रियानने या दोन्ही सिनेमात स्वतःचे अस्तित्व टिकवले आहे.                         शिवाय, ‘मन्या दि वंडरबॉय’ चित्रपटातील त्याच्या ‘मन्या’ या प्रमुख भूमिकेनेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. इतकेच नव्हे तर, ‘बॉईज २’ सिनेमात जरी त्याची छोटी भूमिका असली तरी, त्याने या भूमिकेलासुद्धा न्याय मिळवून दिला आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये चित्रपटांचे आकडे वाढविण्यापेक्षा दर्जेदार आणि लक्षात राहतील अश्याच भूमिकेला अधिक प्राधान्य देणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तो एक आहे. असा हा अमित्रियान आता शिवाजी पाटील या एका रांगड्या तरुणाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आला आहे. व्यक्तिरेखेत वैविध्यता जपणाऱ्या अमित्रियानची हि भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडेल, याची खात्री आहे.