पुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघात सर्वत्र उत्साहात मतदान

827

 पुणे प्रतिनिधी,

जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात सुरळीत व शांततेत मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 55 ते 56टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
         जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिणी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
   जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सर्वच मतदार संघात उत्साहात मतदान झाले असून  जिल्हयातील सर्वच मतदारसंघात शांततेत मतदान झाले.
सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचा उत्साह…


            पुणे जिल्हयातील 7 हजार 915 मतदान केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 21 मतदार संघातील 21 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाजीनगर येथील सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून येत होती.  केंद्रावर मतदारांसाठी पिण्यासाठी पाणी, वीज व आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
            मतदान यंत्राला  व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत असल्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर  बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त  ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत होते. 
नवमतदारांचा उत्साह…
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी  स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याने अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
सकाळपासूनच प्रथमच मतदान करीत असलेल्या तरुण, तरुणीमध्ये उत्साह जाणवत होता. अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाजीनगर येथील कु. वर्षा चांदियाल हिने प्रथम मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. शिवाजीनगर येथील विद्याभवन हायस्कूलच्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्साहात मतदान केले.  पुणे कॅन्टोमेंट येथील सेंट मिराज स्कूल  येथे कपिल गुलवाणी व प्रज्ञा कुकडे यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे आपला अधिकार आहे, आणि तो आपण बजावला पाहिजे, असे मत प्रज्ञा कुकडे यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणेच बहुतांश नवमतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
वयोवृदधांचेही उत्साहात मतदान
कसबा पेठ येथे 89 वर्षाच्या श्रीमती नलिनी परांजपे या आजींनी आपल्या कुटुंबियांसह उत्साहात मतदान करुन आजच्या तरुण पिढीला मतदानासाठी प्रोत्साहन दिले. अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिला मतदारांना स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदत करताना दिसत होते. 
00000