केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ‘ज्ञानसंगम’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

301

पुणे: महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआयएफटीपी’च्या ४५ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने ‘ज्ञानसंगम २०२१’ या राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ व १२ नोव्हेंबर २०२१ या दोन दिवशी अमनोरा-द फर्न क्लब पुणे येथे ही परिषद होणार आहे. 

या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुपारी २.४५ वाजता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर उपस्थित राहणार आहेत. परिषदेचा समारोप शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी ३.०० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती परिषदेचे चेअरमन नरेंद्र सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी यांनी दिली.

या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर मंथन होणार आहे. पहिल्या दिवशी ‘कनॉन्स ऑफ जस्टीस : सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, टॅक्स ट्रिब्युनल’वर मुंबईतील ऍड. लक्ष्मीकुमारण, ‘रोल ऑफ अलाइड लॉज इन इंटरप्रेटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी लॉ’वर दिल्ली येथील ऍड. जे. के. मित्तल आणि जयपूर येथील ऍड. पंकज घिया, तर मानसिक तणाव यावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलणार आहेत. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी ‘अपील मेकॅनिज्म अंडर जीएसटी’वर पुण्यातील ऍड. मिलिंद भोंडे व मुंबईतील ऍड. विनायक पाटकर, ‘फेक इन्व्हाईसिंग’वर सुरतमधील ऍड. अविनाश पोद्दार व गुवाहाटी येथील ऍड. अशोक सराफ, ‘फेसलेस असेसमेंट अंडर इन्कम टॅक्स’वर आयआरएस एस. के. दास व पुण्यातील सीए सुहास बोरा मार्गदर्शन करणार आहेत. ‘टॅक्स की दंगल’ या विशेष सत्राबरोबरच ‘रियल कॉन्ट्रोव्हर्सीज इन रियल इस्टेट इंडस्ट्री इन टॅक्सेशन’वर चर्चासत्र होईल. यामध्ये ‘एआयएफटीपी’च्या माजी अध्यक्षा ऍड. निकिता बोडेखा, जीएसटी तज्ज्ञ सीए नरेश  सेठ, ‘एमटीपीए’चे माजी अध्यक्ष संतोष शर्मा, प्राप्तिकर तज्ज्ञ ऍड. धारण गांधी, सीए स्वप्नील मुनोत सहभागी होणार असून, चर्चासत्राचे संचालन प्रकाश पटवर्धन व ऍड. किशोर लुल्ला करणार आहेत, असे सोनवणे यांनी नमूद केले.