वृक्ष लागवड अभियानात लोकसहभाग महत्त्वपूर्ण

612

पुणे : “सरकारी योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात किंवा सामाजिक काम उभे करण्यात लोकसहभाग अतिशय महत्वाचा असतो. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हाती घेतलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियान प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकसहभागातून अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. लायन्स क्लबच्या पुढाकाराने या अभियानातील लोकसहभाग वाढत असल्याने लवकरच ३३ कोटी वृक्षलागवडीचे स्वप्न पूर्ण होईल,” असे प्रतिपादन आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.

लायन्स क्लब पुणे सारसबाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर परिसरात सुमारे दीडशे पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यावेळी माधुरी मिसाळ बोलत होत्या. प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, बाळासाहेब ओसवाल, पोपटलाल ओस्तवाल, क्लबचे अध्यक्ष नितीन मेहता, आशा ओसवाल, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य दत्तात्रय पोळेकर, डिस्ट्रिक्ट अॅक्टिविटी चेअरपर्सन योगेश कदम, विकास काळे आदी उपस्थित होते. रघुनाथ ढोले यांनी झाडे दिली.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, “लायन्स क्लबचे सामाजिक काम मोठे आहे. बारावीपर्यंत माझे शिक्षण लायन्सच्या शिष्यवृत्तीवर झाले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, स्वच्छ भारत आदी क्षेत्रात लायन्स क्लबने उल्लेखनीय कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी लायन्सचे हे काम पूरक आहे.”

ओमप्रकाश पेठे म्हणाले, “सारसबाग आदर्श असा क्लब आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीना बरोबर घेऊन काम करत असल्याने ते अधिक चांगले होते. झाडे लावणे सोपे आहे. पण त्याची निगा राखणे हे महत्त्वाचे आहे. झाडांच्या संरक्षणासाठी पिंजरे बसवल्याने ही दीडशे झाडे बहरतील आणि भविष्यात सावली देतील.”

राजश्री शिळीमकर, दत्तात्रय पोळेकर, नितीन मेहता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. फतेचंद रांका यांनी प्रास्ताविकात क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या डायलिसिस, आरोग्य तपासणी, रक्तदान, गणेश विसर्जन मिरवणूकीदिवशी ३००० पोलीस मोफत जेवण, महिलांसाठी प्रदर्शन आदी उपक्रमांची माहिती दिली. संतोष पटवा सूत्रसंचालन केले. विकास काळे यांनी आभार मानले.