पुणे :– पुण्यातील अमनोरा स्कूलने पुन्हा एकदा आपला लौकिक सिद्ध केला आहे. इथल्या इयत्ता १२वीतील विद्यार्थी रुद्राक्ष कोलाटे याने कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या CBSE क्लस्टर अॅथलेटिक स्पर्धेत शॉट पुट खेळात सुवर्णपदक जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
शॉट पुट हा खेळ शारीरिक ताकद, मानसिक एकाग्रता आणि शिस्त या गुणांची कसोटी पाहणारा आहे. रुद्राक्षने अप्रतिम कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता मुलांच्या गटात पहिले स्थान मिळवले. ही कामगिरी त्याच्या मेहनतीबरोबरच शाळेतील शिक्षक व मार्गदर्शकांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे शक्य झाली.
या यशाबद्दल बोलताना, अमनोरा स्कूलच्या प्राचार्या मीरा नायर म्हणाल्या, “आम्हाला रुद्राक्षचा प्रचंड अभिमान आहे. चिकाटी, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांचा संगम झाला की मोठे यश मिळते याचे रुद्राक्ष हे उत्तम उदाहरण आहे. अमनोरा स्कूल नेहमीच प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून ती अधिकाधिक विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
अमनोरा शाळेचे क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकवृंद आणि कर्मचारीनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल शाळेतर्फे रुद्राक्षचा सत्कार करण्यात आला. पुढे जाऊन रुद्राक्षकडे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतही चमक दाखवण्याची क्षमता आहे, असा विश्वास शाळा परिवाराने व्यक्त केला असून त्याला सर्वतोपरी पाठबळ देण्याची हमी दिली.



