Monday, October 27, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेसत्याचा शोध घेणारी 'नारीशक्ती'

सत्याचा शोध घेणारी ‘नारीशक्ती’

नारीशक्तीमुळे मिळाला हजारो व्यक्तींना खऱ्या अर्थाने ‘न्याय’

पुणे : गुप्तहेरगिरी हा तसा पारंपरिक पुरुषप्रधान व्यवसाय, परंतु पुण्यातील प्रिया काकडेंनी या समजाला छेद देत सत्याचा शोध घेणाऱ्या नारीशक्तीचा अमीट ठसा उमटविला आहे. खासगी तपासाचे अनवट करिअर निवडलेल्या प्रिया यांनी आतापर्यंत विवाहबाह्य संबंध, विवाहपूर्व पडताळणी, आर्थिक फसवणूक, बेपत्ता व्यक्तींचा शोध अशा विविध प्रकारच्या तब्बल १०९८ प्रकरणांचा यशस्वी उलगडा केला आहे. एखाद्या गोष्टींच्या मूळापर्यंत जाण्याची उत्सुकता आणि सत्य उलगडण्याच्या ध्यासातून त्यांनी पुण्यासह देशभरातील हजारो व्यक्तींना खऱ्या अर्थाने ‘न्याय’ मिळवून दिला आहे.

मूळच्या पुणेकर असलेल्या प्रिया वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना गुप्तहेरगिरीचे आकर्षण होते. त्याबाबत त्या सांगतात, ‘माझ्या घरातून पाचशे रुपये चोरीला गेले होते. शेजारच्या मुलीने ही चोरी केल्याचे मी शोधून काढले. तिचा कबुलीजबाब टेपरेकॉर्डरवर नोंदवून घेतला होता. तेव्हापासूनच एखाद्या गोष्टीचा छडा लावण्याची उत्सुकता माझ्यात निर्माण झाली. त्यानंतर तपास कसा करायचा, याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मी ‘स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सी’ स्थापन केली. त्यानंतर २००६ मध्ये रीतसर नोंदणी करून खासगी तपासाचा व्यवसाय सुरू केला.’

प्रिया काकडे यांनी विवाहपूर्व पडताळणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक संकेतस्थळावरून होणारी फसवणूक, कौटुंबिक वाद, घटस्फोट, पोटगी, विश्वासघाताचे पुरावे संकलित करणे, बनावट प्रोफाइल्सचा शोध, आर्थिक व सायबर फसवणूक, बेपत्ता व्यक्तींचा शोध, वडिलोपार्जित जागा-संपत्ती शोधणे, समन्स बजावणे अशी विविध कामे करतात. त्यांच्या कंपनीत ३५ कर्मचारी गोपनीय तपासाचे काम करतात. एखादे प्रकरण आल्यावर त्याची पूर्णपणे पडताळणी करतात. निष्पक्ष तपास, गुप्तता, कायदेशीर मर्यादा आणि ग्राहकांचा विश्वास जपणे हे आमचे ब्रीदवाक्य असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.

काही प्रकरणांचा खासगी तपास करताना त्यांना जीवावर बेतल्याच्या आव्हानांचाही सामना करावा लागला. ‘दिल्लीत एका डॉक्टरशी संबंधित अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा तपास करताना माझे अपहरण करून अमली पदार्थांचा डोस देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, धैर्याने मी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ते प्रकरण आम्ही यशस्वीपणे उलगडले होते. येरवड्यात एका तपासादरम्यान मारामारीही करावी लागली होती. अशा आव्हानांनी मला अजूनच सक्षम केले,’ असे त्यांनी सांगितले. प्रिया यांच्या या व्यवसायाला कुटुंबियांनी सुरुवातीला कडाडून विरोध केला. मात्र, त्यांनी निग्रहाने आपले ‘पॅशन’ जपले. ‘आता एखादे प्रकरण सुटल्यावर न्याय मिळालेले पक्षकार आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतात. ते पाहून घरच्यांना समाधान वाटते. ते आता मला पाठबळ देतात,’ असेही त्या सांगतात.

….

पोलिस दलातील सर्व पदांवर महिला सर्वोत्तम कामगिरी करतात. लष्करात आता लढाऊ भूमिकांमध्येही महिला यशस्वीपणे कार्यरत आहेत. मग खासगी तपासाचे करिअरही महिला निवडू शकतात. प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची ओळख निर्माण करू शकतात.

* प्रिया काकडे

….

अखंड सावधानता आवश्यक

घटस्थापना करताना आपण मातीत बीज रोवतो, त्याप्रमाणे माणुसकी जपत समाजात सत्याचे बीज पेरल्यास न्यायाचे नवीन अंकुर उगवेल, यावर प्रिया काकडेंचा दृढ विश्वास आहे. ‘आयुष्यात कोणताही निर्णय घेताना, मग तो जीवनसाथी निवडणे असो वा आर्थिक गुंतवणूक करणे असो, त्याची पारख-पडताळणी व्यवस्थित केली पाहिजे; तसेच अखंड सावध राहिले पाहिजे. त्यामुळे फसवणूक होत नाही,’ असेही त्या आवर्जून नमूद करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!