Saturday, November 22, 2025
Google search engine
HomeMalhar Newsसुनेच्या त्रासातून सासरच्यांची डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी केली सुटका

सुनेच्या त्रासातून सासरच्यांची डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी केली सुटका

पुणे : पुण्यातील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबाची सुटका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्या अचूक आणि प्रभावी तपासामुळे झाली आहे. या प्रकरणात घरातील लहान सुनेने आपल्या सासू-सासऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना नकळत झोपेच्या गोळ्या देऊन त्रास देत असल्याचे उघड झाले. इतकेच नव्हे, तर ती आपल्या प्रियकरासोबत दिवसा घरात अनैतिक संबंध ठेवत असल्याचे तपासात समोर आले.

हे कुटुंब शहरातील नावाजलेले व्यापारी असून घरात वृद्ध दाम्पत्य, त्यांचे दोन पुत्र आणि दोन सुना असा परिवार राहात होता. मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा दोघेही त्यांच्या व्यवसायात दिवसभर व्यस्त असत. काही महिन्यांपासून वृद्ध दाम्पत्याला सतत झोपेचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला वयामुळे त्रास होत असावा असे वाटून त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली — वृद्ध दाम्पत्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अति प्रमाण आढळले.

डॉक्टरांनी मोठ्या सुनेची तपासणी केली असता तिच्या अहवालात देखील गोळ्यांचे प्रमाण दिसले, परंतु लहान सुनेच्या चाचणीमध्ये काहीही आढळले नाही. त्यामुळे डॉक्टरांना शंका आली, परंतु कुटुंबातील गोपनीयतेमुळे त्यांनी ती गोष्ट थेट सांगितली नाही. लहान मुलाच्या शारीरिक व्यंगामुळे त्याचे लग्न जुळण्यात अडचणी येत होत्या. उशिरा का होईना एका मुलीने पसंत केल्याने त्याचे लग्न झाले, त्यामुळे त्याचा संसार सुरळीत व्हावा यासाठी घरातील सर्वजण प्रयत्नशील होते.

दरम्यान, काही दिवसांत घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे छोटे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. ही घटना आणि झोपेचा त्रास या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने कुटुंबीयांचा संशय नव्या, नुकत्याच लग्न झालेल्या लहान सुनेवर गेला. मात्र केवळ संशयाच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी त्यांनी पुरावे गोळा करण्याचे ठरविले.

पुरावे मिळत नसल्याने कुटुंबाने सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांच्याशी संपर्क साधला. प्रिया काकडे यांनी तिच्याशी मैत्री करत विविध प्रकारे पुरावे गोळा केले आणि काही दिवसांतच सत्य समोर आले. तपासाअंती कळाले की, लहान सून दररोज सकाळच्या नाष्ट्यामध्ये आपल्या सासू-सासऱ्यांना आणि घरच्यांना झोपेच्या गोळ्या मिसळून देत होती. इतकेच नव्हे, तर ती दिवसा ढवळ्या घरात आपल्या प्रियकराला बोलवत आणि दोघांचे अनैतिक संबंध निर्माण होत.

पुरावे पाहून कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी सुनेला समोर बसवून सर्व काही सांगितले असता सुरुवातीला तिने नकार दिला, परंतु पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यावर तिने आपली चूक कबूल केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नातेवाईक आणि समाजातील मान्यवरांची बैठक बोलावून प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. बैठकीत सुनेचे सर्व कारनामे उघडकीस आले. कुटुंबीयांना परत चोरी गेलेले दागिने आणि पैसे मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचा घटस्फोट घेऊन या अध्यायाला पूर्णविराम दिला.

या संपूर्ण घटनेत स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी दाखविलेली संवेदनशीलता, गुप्त तपासाची कार्यकुशलता आणि तांत्रिक कौशल्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या तपासामुळे एका निष्पाप कुटुंबाची सुटका झाली आणि समाजात सावधगिरीचा संदेश गेला.

प्रिया काकडे यांनी सांगितले, “अशा प्रकरणांमध्ये केवळ शंका पुरेशी नसते, पुरावे मिळवणे अत्यावश्यक असते. सत्य कधी ना कधी समोर येतेच.” ही घटना पुणे शहरात चर्चेचा विषय ठरली असून, ती प्रत्येक घरासाठी एक इशारा आहे. विश्वास हा महत्त्वाचा असला तरी सावधगिरी त्याहून अधिक आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!