गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य : पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर

481

आळंदी गणेश मंडळ बैठकीत आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गणेश उत्सवाचे काळात कोणतीही दुर्घटना होवू नये याची सर्वानी दक्षता घ्यावी….कोरोना काळ कठीण होता. पोलीस प्रशासनात आम्ही ही नागरिक आहे. आम्हाला ही भावना आहेत…… मात्र सार्वजनिक हिताचे दृष्टीने काळजी घेणे, नियम पाळणे, भाविक,नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी मंडळांच्या परिसरात मंडळांनी भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत उपाय योजनेत सीसीटीव्ही लावावेत. उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करून सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर केले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चाकण विभाग अंतर्गत असलेल्या आळंदी, दिघी,चाकण, म्हाळुंगे पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या गणेश मंडळे पदाधिकारी , कार्यकर्ते यांचे संवाद बैठकीचे आयोजन आळंदीत करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना परिमंडळ १ चे पोलीस उप-आयुक्त मंचक इप्पर बोलत होते.
यावेळी चाकण उपविभाग अंतर्गत चाकण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे) रमेश पाटील, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे,माजी नगरसेवक डी. डी.भोसले, कालिदास वाडेकर, सागर बोरुंदीया, आनंदराव मुंगसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे सह पंचक्रोशीतील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गणेश उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी यांचेशी सुसंवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर संवाद साधताना म्हणाले, सर्वानी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. कोरोना महामारीचे संकटा नंतर खुल्या वातावरणात आता गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामुळे मंडळांसह गणेश भक्त भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना प्रशासनाची जबाबदारी फार वाढली आहे. गणेश मंडळे संख्या, घरगुती गणेश उत्सव यांचे संख्येचा विचार करता पोलीस प्रशासनाची कर्मचारी यांची संख्या खूपच कमी आहे. उत्सव यात्रा काळात पोलीस प्रशासनास सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. उत्सव काळात विधायक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासावी. उत्सव काळात सर्वतोपरी सहकार्य उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना केले जाईल. समस्या, अडचणी सोडविण्यासाठी थेट संपर्क केला तरी चालेल असे आवाहन त्यांनी करीत मंडळांशी सुसंवाद साधला. गणेशोत्सव उत्साही शांततामय वातावरणात साजरा करीत असताना पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले. उत्सव आनंदाने साजरा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण कायदा मानणारे आणि लोकशाही मानणारे आहोत. आपण स्वतःवर काही बंधने लादून घेतली आहेत. या उत्सवात समाज प्रबोधन पार कार्यक्रमांचे आयोजन करावे. यात सांस्कृतिक, कला,क्रीडा, शालेय मुलांचे कलागुणांना वाव देण्यास विविध स्पर्धां घ्याव्या. उत्सव आनंदी शांततेत होईल. यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, गेली दोन उत्सव वर्ष आपण निर्बंध असताना अत्यंत साधे पणाने साजरे केलेत. आता दोन वर्षांनी पहिल्यांदा गणेश उत्सव निर्बंधाविना साजरे होणार आहे. कोरोनाचे काळातून जात असताना साधेपणाने उत्सव साजरे केले. यासाठी सर्व घटकांनी तसेच गणेश मंडळांनी सहकार्य केले. यामुळे सर्व गणेश मंडळांचे अभिनंदन आणि कौतुक करीत आहे. येत्या उत्सव काळात देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणा-या मंडळांनी नियम, शिस्त पाळुन उत्सव साजरा करायचा असल्याचे कट्टे यांनी सांगितले. उत्सवातूनआपणास आनंद मिळेल. उत्सव काळात बेजबाबदार वर्तन होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्यथा संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल. असे काम करू नये. आपल्या सूचना नवीन कल्पना यांचे जरूर स्वागत केले जाईल असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या मोजक्याच उपस्थिती वरून त्यांनी नाराजी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, जे पदाधिकारी येथे बैठकीला आले नाहीत त्यांना येथे उपस्थित असलेल्या पदाधिकारी यांनी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. शक्यतो गणेश मंडळे नोंदणीकृत असावीत. मंडळांनी सर्व प्रकारच्या अधिकृत परवानग्या तसेच वज जोड देखील अधिकृत घेतल्यास भविष्यात दुर्घटना घडणार नाहीत. गणेशोत्सव काळात पोलीस ठाण्यातील अंमलदार यांना आपले उत्सवातील आरतीत सहभागी करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ठराविक गणेश मंडळे ठाणे अंमलदार यांना दत्तक देण्यात येतील. त्यांचेकडून अडचणी पालक म्हणून दूर करतील. ते भेट देतील. गर्दी मध्ये प्रसाद वाटप कार्यक्रम करताना काळजी घ्यावी. श्रींचे मूर्तीची सुरक्षिततेस प्राधान्य द्या. स्वयंसेवक किमान एक तरी संबंधित उत्सवाचे ठिकाणी तैनात करून उत्सवात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी दक्षता घ्यावी. उत्सव काळात मंडळा जवळ जुगार, पत्ते खेळताना रेड मध्ये सापडल्यास कारवाई केली जाईल. उत्सव काळात ध्वनी प्रदूषण विषयक नियमांचे सर्वानी पालन करून आपल्या उत्सवातून इतर नागरिकांना त्रास अथवा गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी. उत्सव काळातही डी. जे. वाजविण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हे दाखल होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. उत्सवातील कारणांनी भविष्यात नोकरीत कोणाला अडचण येवू नये. याची काळजी घ्यावी. उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना गणेश अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाणार आहे. यात गौरव करताना, शिस्त, उल्लेखनीय कार्य, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, मिरवणूक लक्षवेधी आदींचा विचार केला जाणार आहे. सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रेरणा कट्टे यांनी केले.
यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे म्हणाले, उत्सव काळात डी. जे. वाजविण्यावर बंदी असून डी.जे.साठी परवानगी मिळणार नाही. कोणीही उत्सवात डी.जे. वाजवू नये. गणेशोत्सवातील काळात फक्त पाच दिवस रात्री बारा वाजे पर्यंत मर्यादित आवाज ठेवून स्पीकरला परवानगी देण्यात येईल. इतर दिवशी मात्र यावर मर्यादा राहतील. गणेश उत्सव सण शांततेत साजरे व्हावेत. उत्सव काळात कुठेही गालबोट लावू देवू नये असे आवाहन गोडसे यांनी केले.
यावेळी पंचक्रोशीतील पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असलेल्या मंडळांचे पदाधिकारी तसेच शांतता कमेटीचे पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त केली. यात माजी नगरसेवक डी.डी.भोसले, आनंद मुंगसे, कालिदास वाडेकर आदींचा समावेश होता. यावेळी सूचना देत मंडळांनी मिरवणुकी दरम्यान रस्त्यावरील ओव्हरहेड वायर आणि वीज पुरवठा, श्रींचे विसर्जन कृत्रिम हौद याबाबत सूचना करण्यात आल्या.
प्रास्ताविक आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी मानले.चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन निसार सय्यद यांनी केले.