शेती विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची-केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे प्रतिपादन

217

पुणे,

भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. कैलाश चौधरी,  भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि विस्तार), काणेरी मठ कोल्हापूरचे अध्यक्ष परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

पुढे बोलतांना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले की, देशात सध्या 783  कृषि विज्ञान केंद्र कार्यरत झाले असून सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने या संदर्भात अनेक हवामान अनुकूल तसेच जैवसंपृक्त वाण विकसित केले आहेत. कोविड काळात सुद्धा कृषि क्षेत्राचे काम उल्लेखनीय राहिले असून भारत आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे. भविष्यात कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना अधिक जबाबदारीने काम करावे लागेल असे ते म्हणाले.

कृषी राज्यमंत्री श्री. कैलाश चौधरी म्हणाले की, देशाला सध्या नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय पंतप्रधान कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासाच्या बाबतीत सकारात्मक असून कृषि विज्ञान केंद्राचे कृषि क्षेत्रातील योगदान पाहता भविष्यात कृषि विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी डॉ. यु. एस. गौतम आणि काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या प्रसंगी अटारी पुणे ने तयार केलेली चित्रफीत गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीबाबत पुस्तकाचे विमोचन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

तत्पूर्वी सकाळी कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी “नैसर्गिक शेती व पौष्टिक तृणधान्ये” या विषयावरील कार्यशाळेचे उद्‌घाटन केले. या कार्यशाळेस महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, गुजरातच्या नैसर्गिक शेती कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. के. तिंबडीया, शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके, कृषितज्ज्ञ विजय आण्णा बोराडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. लाखन सिंग यांनी केले.