बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा

1074

पुणे प्रतिनिधी,

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून शिक्षकांमार्फत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक सर्वे केला जात आहे .या सर्वेच्या कामामध्ये अनेक शिक्षक जुंपले गेले आहे .अगोदरच कोरोनाच्या धास्तीने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असतानादेखील त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य म्हणून कोरोना विषाणूचा सर्वे करण्यास संमती दर्शविली. अनेक शिक्षक या कार्याला उस्फूर्तपणे हजर झाले परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव या शिक्षकांच्या पदरी पडला.

आरोग्य विभागाकडून आरोग्य संबंधीची कुठलीही दक्षता न घेता शिक्षकांच्या माथी सर्वेचे काम टाकून प्रशासन त्यांच्यावर जबरदस्ती करू पाहतोय. शिक्षकांना कुठल्याही प्रकारचे मास्क ,सनीटायजर ,हॅन्ड ग्लोज यांचा पुरवठा न करता तसेच सर्वेक्षणा करिता पाठवण्यात येत आहेे. सर्वेक्षण संदर्भात कुठलीही पूर्व बैठक न घेता शिक्षकांना सदर कामात जुंपले आहे.

शिक्षक कोरोनासंदर्भात सर्वे करत असताना यासंबंधीचा नियमित सर्वेक्षण आढावा क्षेत्रीय कार्यालयात द्यावा लागतो. घर सर्वेक्षण संख्या हे मोबाईलद्वारे दिले जातात.
परंतु सर्वेक्षण संबंधीची बैठक क्षेत्रीय कार्यालयात घेण्याकरता संबंधित शिक्षक हजर झाले असता तिथे वेगळे चित्र पाहायला मिळाले .

बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात एका हॉलमध्ये 70 ते 80 शिक्षकांना बैठकीकरिता एकत्रित बोलवून आरोग्य अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचा धुव्वाच उडवून दिला आहे.कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टनसिंगसंदर्भात काळजी न घेतल्याचे व पूर्वनियोजन नसल्याचे पाहावयास मिळाले .सर्व शिक्षकांना एकत्रित बोलवल्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे जाणवले .कोरोना संदर्भात अधिकारीवर्ग जागरूक नाहीत का ? विनाकारण प्रशासन शिक्षकांना वेठीस धरू पाहतय की काय? असा सवाल शिक्षक करत आहेत. शिक्षकांनी या संबंधीची तक्रार संबंधित शिक्षक संघटनेकडे केली असून त्यावर योग्य तो न्याय मिळावा असे मत शिक्षकांकडून व्यक्त केले जात आहे .