गिरीश भोपी,अलिबाग, रायगड
करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात नवी मुंबई परिसरातील प्रामुख्याने पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली येथे वास्तव्यास असणारे अनेक अधिकारी,कर्मचारी हे मुंबईत अत्यावश्यक सेवा कर्तव्यावर आहेत. हे कर्मचारी रोज नवी मुंबई परिसरातून मुंबई येथे स्वत:च्या अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन प्रवास करीत आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील करोना विषाणूबाधित व्यक्तींची माहिती घेतली असता प्रामुख्याने त्यामध्ये मुंबईत अत्यावश्यक सेवेत असणारे व पनवेल परिसरातून रोज ये-जा करत असणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. एकंदरीतच करोना विषाणूची बाधा त्यांना त्यांच्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी झाल्याचा निष्कर्ष निघत आहे.
या पार्श्वभूमीवर या विषयी त्वरित निर्णय घेण्याविषयीची मागणी असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच राज्यमंत्री, उद्योग व खनिकर्म या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांना लेखी पत्राद्वारे पनवेल व नवी मुंबई परिसरातील वाढता करोना विषाणूचा प्रादूर्भाव पाहाता या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांना अत्यावश्यक सेवेतून काही प्रमाणात वगळणे किंवा त्यांच्या मुंबईतील अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली आहे.