प्रवेश निश्चितीसाठी केली पन्नास हजाराची मागणी
गणेश जाधव, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शिवाजी बोखारे यांना ५०,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई पुणे ,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे लाच स्वीकारताना अटक झाल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्काच्या चर्चा सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे म्हणाले की, यातील तक्रारदार महिलेने आपल्या मुलीचे एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण हक्क कायदा २००९ (आर .टी .ई)अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने नाव समाविष्ट केले परंतु प्रवेश प्रक्रियेतील दुसरा टप्पा कागदपत्राची छाननी करून प्रवेश निश्चित करणे असा असल्याने त्यांनी कागदपत्रांची छाननी करण्याकरिता शिक्षण विभाग ,पुणे महानगरपालिका सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे यांच्याकडे कागदपत्र सादर केले ,परंतु कागदपत्रांची छाननी तसेच प्रवेश निश्चितीकरिता त्यांनी ५०,००० /- रुपयांची लाचेची मागणी केली . तसेच प्रवेश निश्चित करून लाचेची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आरोपी लोकसेवक यांच्याकडून करण्यात आली. लाच दिल्याशिवाय आपल्या पाल्याचे नाव शैक्षणिक यादीत येणार नसल्याची खात्री पटल्यांनातर तक्रारदार महिला यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, पुणेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता ती खरी असल्याचे आढळले. त्याप्रमाणे एसीबी पुणे पथकाने यशस्वीरित्या सापळा लावला. तक्रारदाराकडून प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे यांना अधिकारी कक्षात ५०,००० /- रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी राजेश बनसोडे यांनी रंगेहात पकडले.
सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत त्यांनी अँटी करप्शन ब्युरो टोल फ्री. क्रमांक १०६४ संपर्क करावा , असे आवाहन केले आहे.