Homeताज्या घडामोडीविठुरायाची वारी: मानवी शुद्धतेचे माध्यम

विठुरायाची वारी: मानवी शुद्धतेचे माध्यम

*संपत्ती सोहळा ना आवडे मनाला*

*लागला तो लळा पंढरीचा*
*जावे पंढरीसी आवडे मनासी*
*आषाढी एकादशी व्रत हे |*

*तुका म्हणे ऐसी*
*आर्त ज्याचे मनी*
*त्याची चक्रपाणी वाट पाही !*

मानवी समूहासोबत राहत असताना स्वतःमधील शुद्धतेला अधिक फुलवण्यासाठी तथाकथित जाती, धर्म, वर्ण, मोह, माया, अहंकार, अविचार, अज्ञान, अंधार, द्वेष, हिंसा, कटुता, अन्याय, अत्याचार अशा मानवी संकुचित विकारांना मूठमाती देऊन स्वतःमधील चांगुलपणाच्या भगवंताला भेटण्यासाठीचा प्रवास म्हणजे खरंतर वारी होय. मानवी मनाच्या सर्व अवस्था त्यागून स्वतःच्या शोधात असताना जगाच्या कल्याणाचा शोध घेत स्वतःमधील भगवंताला भेटणे, हिच खरी वारीची समर्पकता असते. माऊलींच्या जयघोषात स्वमधील भगवंताला मानवतेशी एकरूप करून समता समानतेसाठी पायी चालणारा जीव म्हणजे खरंतर वारकरी..!
जगाला लुभावणारी आपल्या पंढरपुरातील विठुरायाची आषाढी वारी ही मानवी शुद्धतेचे सर्वात मोठे माध्यम आहे. पंढरीच्या विठुरायाच्या वारीची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. आजपर्यंत अनेक ज्ञानी, संत, पंत, आचार्य, समस्तजनांनी, वैष्णवांनी पंढरपूरची पायी वारी केली आहे. पुंडलिकाच्या भक्तिभावापोटी संसारा पेक्षा भक्ताला महत्व देऊन भगवान विठ्ठल आजही विटेवरी उभे आहेत. अशा अनेक आख्यायिका आपण ऐकल्या असतील. म्हणजेच भक्तिरसातील भेद विरहित शुद्ध मानवतेचा भाव भगवतांना प्रिय आहे. म्हणूनच विठ्ठल हा सर्व भाविक वैष्णवांचा भगवंत आहे. असे मानले जाते.
आजमितीला आपण पंढरपूरच्या आषाढी वारीला ज्ञान पंढरीचे जागतिक विश्वशांती संमेलन असे संबोधत आहोत. आजपर्यंत अनेक संतांनी मानवजातीच्या कल्याणासाठी, जागतिक मानवी सलोख्यासाठी आणि विश्वमानवतेसाठी विश्वशांतीचा मार्ग सांगितला आहे. आज विश्वशांतीसाठी लोकांनी सर्व बाबतीत विवेकी होऊन वैश्विक सलोख्याने जागतिक स्तरावर मानवता जोपासणे आवश्यक झाले आहे. अशा वेळी जगाच्या पाठीवर लाखो लोकांना एकत्र जोडणारी ही पंढरीची वारी असल्याने, त्या ज्ञानपंढरीला आपण विश्वशांती संमेलन म्हणून देखील संबोधीत करत आहोत.
माणसे थोडीफार जास्त शिकली की ती अहंकारी होण्याची शक्यता अधिक असते. ज्ञान लोकांना अहंकारी बनवत नाही. पण ज्ञानामुळे आलेला कथित मोठेपणा हा मानवी स्वभावाला अहंकार देऊन जातो. आणि तो अहंकार सोबत घेऊन माणूस त्याच्या दैनंदिन आयुष्यात जगत असतो. अहंकार माणसाला शेवटी विनाशाकडे घेऊन जाणारा असतो. विठुरायाच्या वारीमध्ये मात्र सर्व वैष्णव गोपाळ ज्ञान, अज्ञान, मोठेपणा, अहंकार सर्व बाजूला ठेऊन केवळ शुध्द भक्तिभावाने वारकरी म्हणून आलेला असतो. म्हणूनच भक्तीभावाचा वसा देणारी ही वारी खऱ्या अर्थाने ज्ञानपंढरी असते.

*जे का रंजले गांजले |*
*त्याशी म्हणे जो आपुले ||*
*तोचि साधू ओळखावा |*
*देव तेथेची जाणावा ||*

रंजल्या गांजल्यांना आपलंसं करून त्यांचा पालनहार करणारा हा विठोबा सामाजिक न्यायाचे खरे प्रतिक आहे. या आषाढीच्या विठोबाच्या वारीमध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन भगवंताला भेटायला पायी वारी करतात. वारी भेदभाव करत नाही. तर माणसातील भेद – खेद समूळ नष्ट व्हावा, याचा विचार आणि आचार वारी देत राहते. वारी माणसा माणसांना जोडणारा मानवतेचा दुवा प्रवाहित करते. पंढरीच्या या वारीमुळे लोकांमधील मानवी नैतिक मूल्ये वाढीस लागतात. आज भारतीय संत साहित्याचा अगाध महिमा आणि विश्वात्मके पसायदानाची ही संस्कृती केवळ पंढरीच्या याच ज्ञानवारीमुळे टिकून राहिली आहे. पायी चालत देवाला भेटायला जात असताना सर्वजण एकमेकांना बंधूभावाची वागणूक देतात. आणि म्हणूनच या वारीला वैष्णवांचा मेळा म्हणून देखील ओळखले जाते. या वारीमध्ये प्रत्येक वारकरी हा एकमेकांसाठी भगवंत म्हणजेच माऊली झालेला असतो. माऊली म्हणजे माय. माऊली म्हणजे आई. आणि ही विठाई उभ्या जगाच्या कल्याणासाठी या विटेवरी अखंड उभी आहे.
*या रे या लहान थोर |*
*याती भलते नारी नर ||*

यावरून आपण समजू शकतो की ही समतेची दिंडी असते. लहान – थोर, नारी – नर असे सर्वजनच हरिनामाचा गजर करत या वारीच्या रिंगणात समता दर्शवतात.

अशा प्रकारे समता, समानता, बंधुता, आदर, स्नेह, प्रेम, भक्तिभाव, सामाजिक ऐक्य, मानवी एकात्मता, या जागतिक शांतता आणि मानवी सलोख्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मानवी संबंधाचे स्वरूप केवळ लाखोंच्या संख्येने याच ज्ञान पंढरीत पाहायला आणि अनुभवायला मिळते. एकमेकांच्या पायांचे दर्शन घेऊन या वारीमध्ये मानवी आदर आणि उदारता जगायला मिळते. विश्वशांतीसाठी आवश्यक असणारा मानवतेचा महामार्ग म्हणजेच पंढरीची वारी होय.
म्हणूनचं म्हणतो एकदा तरी पायी वारी अनुभवावी..
सगळ्या मोह मायाजाळातून बाहेर पडून वैष्णवांचा मेळा अनुभवावा..!!

*- विक्रम मालन आप्पासो शिंदे*
कवी, लेखक, साहित्यिक
7743884307

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments