Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeमराठी बॉलीवुडम्हणून ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला....

म्हणून ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला….

‘कोठारे व्हिजन’ची निर्मिती असलेली, ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका ‘झी युवा’ वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली आहे. प्रोमोमधून प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या या मालिकेने, अवघ्या काही दिवसांतच मोठा चाहतावर्ग मिळवलेला आहे. हटके संकल्पना असेलल्या या मालिकेतील अभिनेते ‘मोहिनीराज गटणे’ यांनी मालिकेबद्दल मांडलेले त्यांचे मत;

१. हा कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेण्याचे नेमके कारण काय?

आपल्या कलेची कदर करून आपल्याला स्वतःहून कुणी उत्तम भूमिका करण्याची संधी देत असेल, तर खूपच आनंद होतो. ‘कोठारे व्हिजन’सारख्या मोठ्या बॅनरने माझ्याशी संपर्क साधला याचा खूप आनंद होता. ‘झी युवा’ वाहिनीसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. उत्कृष्ट प्रोडक्शन आणि लोकप्रिय वाहिनीवरील मालिका, यामुळे काम नाकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. याशिवाय, ही भूमिका थोडी हटके आहे. अशाप्रकारची भूमिका करत असतांना, मी त्या पात्राला योग्य न्याय देऊ शकतो याची मला खात्री होती. माझ्यातील अभिनयाचे गुण, या भूमिकेतून उत्तमरीत्या दर्शवता येतील हे लक्षात आलं. म्हणून ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला.

२. ‘प्रेम पॉयजन पंगा’ मालिकेतील तुमच्या भूमिकेविषयी थोडंसं सांगा.

दोन मुलांचा पिता आणि घरातील कर्ता पुरुष या दोन महत्त्वाच्या गोष्टी या भूमिकेशी निगडित आहेत. घरातील वातावरण नेहमी खेळीमेळीचं आणि आनंदी असावं अशी या कुटुंबप्रमुखाची इच्छा आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांशी तो छान जुळवून घेतो. या सगळ्याच गोष्टी विनोदी स्वरूपातून मालिकेत मांडण्यात आल्या आहेत. हे एक आव्हान असलं, तरीदेखील ही भूमिका करायला खूप मजा येते.

३. या मालिकेची संकल्पना फारच वेगळी आहे. याविषयी आम्हाला काय सांगाल?

संकल्पना नक्कीच खूप निराळी आहे. हे असं वेगळं काहीतरी सुचणं, ही एक कला आहे. सगळ्यांना ते जमत नाही. लेखकांना ते सुचतं, पण ते कसं सुचतं हे सहज सांगता येत नाही. असंच या मालिकेतून, प्रेक्षकांना वेगळं, काहीतरी खास पाहायला मिळतंय. मालिका जशी जशी पुढे सरकेल तशी त्यातील गम्मत अधिकाधिक खुलत जाईल. त्याविषयी मी सांगण्यापेक्षा, तुम्ही सर्वांनी ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका अवश्य पहा.

४. या भूमिकेविषयी चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो आहे?

चाहत्यांकडून खूप छान प्रतिसाद मिळतोय. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० ते ९ या वेळात ‘प्रेम पॉयजन पंगा’ बघण्यासाठी आम्ही ‘झी युवा’ वाहिनी लावून टीव्हीसमोर बसलेले असतो, असं अनेक प्रेक्षकांनी सांगितलं आहे. मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांचं ज्यावेळी कलाकृती उत्तम घडत असल्याचं समाधान होतं, त्यावेळी प्रेक्षकांना सुद्धा ती कलाकृती आवडेल याची खात्री असते. या मालिकेच्या निमित्ताने आम्ही सगळेच जण या गोष्टीचा अनुभव घेत आहोत. कुठलीही भूमिका लोकांना आवडणं आणि ती प्रेक्षकांच्या मनात रुजणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद बघून, ही भूमिका त्यांच्यापर्यंत उत्तमप्रकारे पोचली आहे, हे नक्की लक्षात येतंय.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!