अमृता फडणवीस यांनी गायलं ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ चित्रपटातील गीत

484

पुणे प्रतिनिधी,

मन, माती आणि देश यांचं खूप जवळचं नातं असतं. याचा प्रत्यय आजवर अनेकांनी घेतलाही असेल. प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाबाबत आणि आपण जिथं जन्मलो त्या मातीबाबत आदराची आणि कृतज्ञतेची भावना असते. काही मोक्याच्या क्षणी ती शब्दांद्वारे मनातून बाहेरही पडते. विशेषत: परदेशी भूमीवर गेल्यावर आपला देश आणि इथल्या मातीविषयीची ओढ मनात आठवणींचं काहूर माजवते. हिच भावना सिनेरसिकांना ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटातील एका गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुहूर्त झालेल्या ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील महत्त्वाचं गाणं नुकतंच रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून पराग भावसार टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात बिझी आहेत. नुकतंच अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. सुमधूर आवाजाची देणगी लाभलेल्या अमृता फडणवीस यांनी हे गीत गायलं आहे. हे गाणं गीतकार श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून आकाराला आलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याबद्दल अमृता म्हणाल्या की, गीतकारांनी लिहिलेली शब्दरचना मनाला भिडणारी आहे. ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे शब्दच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यापुढील ‘नकोस विसरू परदेशी तू कधी आपला देश…’ हे शब्द भारतापासून दूर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना आपल्या मातीची आठवण करून देणारे आहेत. मनातील भावना अचूक शब्दांच्या सहाय्यानं या गीतात मांडण्यात आल्या असून, संगीतकार दिनेशजी यांनी त्याला सुरेल संगीताचा साज चढवल्यानं हे प्रेरणादायी गीत मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणारं ठरेल यात शंका नाही. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाच्या टायटलसाठी हे गाणं अगदी अनुरूप असल्याची भावनाही अमृता यांनी व्यक्त केली. या गाण्यापूर्वी ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील टायटल साँग रेकॅार्ड करण्यात आलं आहे.

पराग भावसार हे या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन करणार आहेत. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या शीर्षकारून चित्रपटातील कथानकाचा अंदाज लावणं तसं कठीण असलं तरी यात एक गोड प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘ज्या मातीवर…’ या गाण्याबाबत भावसार म्हणाले की, हे या चित्रपटातील अतिशय महत्त्वाचं गाणं असून, कथानकाला कलाटणी देणारं आहे. अंगावर रोमांच आणणाऱ्या या गीतासाठी आम्हाला एक सुमधूर आणि त्यातील शब्दांना योग्य न्याय देणारा आवाज हवा होता. यासाठी एकच नाव डोळ्यांसमोर आलं ते म्हणजे अमृता फडणवीस… त्यांनीही या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली असून, शब्दांमधील भाव गाण्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे गाणं जेव्हा रिलीज होईल, तेव्हा प्रेक्षकांनाही याची निश्चितच खात्री पटेल असंही भावसार म्हणाले.

‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ चित्रपटाची पटकथा व संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. नामांकीत सिनेमॅटोग्राफर महेश आणे कॅमेरा हाताळणार असून, संकलनाचं काम राहुल भातणकर करणार आहेत. निर्मितीप्रमुखाची जबाबदारी सदाशिव चव्हाण सांभाळणार आहेत. सध्या या चित्रपटातील कलाकारांची निवडप्रक्रिया सुरू असून त्यानंतर पुढील कामाला गती देण्याची योजना आखण्यात आली आहे.