पुणे
आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५’ कार्यक्रमाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या महर्षी अण्णासाहेब शिंदे मनपा २५ जी, घोरपडी पेठ या शाळेला रमाकांत काटमोरे, सहसंचालक प्राथमिक पुणे, महाराष्ट्र राज्य यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना शालेय पाठ्यपुस्तक पुस्तकं आणि खाऊवाटप केले.
आज पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणं ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी नवोदित बाल विद्यार्थ्यांना त्यांच्या पायाचे ठसे उमटवून शैक्षणिक जीवनाची सुरुवात उत्कृष्टपणे साकारण्याचा संदेश त्यांनी दिला..शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीनं अध्यापन केले पाहिजे, असं आवाहन केलं.
याबरोबरच राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत विकास काटे ,क्रीडा अधिकारी पुणे मनपा यांनी स्पष्ट केले..
या कार्यक्रमाला रमाकांत काटमोरे सहसंचालक प्राथमिक पुणे, विकास काटे क्रीडा अधिकारी पुणे मनपा, मराठी माध्यम मुख्याध्यापिका सौ. रोहिणी भराडे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका सौ.प्रणाली पोटे तसेच शाळेचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पालकआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. श्रद्धा नलगे यांनी केले.




