Homeताज्या घडामोडीभक्तामर कलश तीर्थावर झाला दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम

भक्तामर कलश तीर्थावर झाला दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम

भांडगाव पंचकल्याणक महोत्सवात भव्य शोभायात्रा; मंगलमय वातावरणात श्रावक- श्राविका मंत्रमुग्ध

पुणे (प्रतिनिधी) : यवतजवळील भांडगाव (ता. दौंड) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे ‘१००८ आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’स मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या महोत्सवानिमित्त तीर्थस्थळी दिगंबर जैन राष्ट्रसंत, आचार्य, उपाध्याय तसेच साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम सुरू असून संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी (दि.१२) जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त देवाच्या जन्माभिषेकाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी श्रावक-श्राविका मंगलमय वातावरणात मंत्रमुग्ध झाले होते.
महोत्सवात पहाटे शांतिजाप व जिनदर्शन पार पडले. त्यानंतर जिनेंद्राभिषेक, शांतिधारा, नित्यपूजा आणि शांतिहवन करण्यात आले. सकाळी तीर्थंकर जिनबालक जन्मोत्सव सभा व संबंधित विधी संपन्न झाले. त्यानंतर प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले.

शनिवार (दि.१४ मार्च) रोजी ४८,००० मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाणार आहे. या अनोख्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

जन्मकल्याणकानिमित्त सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये श्रावक-श्राविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. दुपारी पांडुकशिलावर १००८ कलशांनी जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर जिनबालक श्रृंगार व नामकरण सोहळा पार पडला. सायंकाळी आचार्य संघांचे प्रवचन झाले. यानंतर गुरूभक्ती, आनंदयात्रा, आरती, शास्त्रस्वाध्याय, तांडव नृत्य, पाळणा व बालक्रीडा कार्यक्रम झाले. या सर्व कार्यक्रमांमुळे संपूर्ण तीर्थस्थळ परिसर भक्तिरसात चिंब झाला होता.

या जन्मकल्याणक महोत्सवाची माहिती भक्तामर तीर्थ पंचकल्याणक समितीचे किशोर जिनदत्त शहा (चंदूकाका सराफ), डॉ. सारंग शरद कुमार शहा, श्रीमती सुजाता निरंजन शहा, डॉ. स्वप्निल महावीर शहा (पुणे), अतुल गांधी (बारामती), मिलिंद फडे व चेतन शहा (बारामती), वीरकुमार शहा आणि सुरेंद्र बडजात्या यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी (दि.१३ मार्च) दीक्षा कल्याणक महोत्सवात पहाटे शांतिजाप व जिनदर्शन झाले. सकाळी सहा वाजता जिनेंद्राभिषेक, शांतिधारा, नित्यपूजा, जन्मकल्याणक पूजा विधान व शांतिहवन पार पडले. यानंतर भोगोपभोग सामग्री स्थापना, अविद्यात्व स्थापना, वागदान, आचार्य संघ प्रवचन सभा, मानस्तंभ जिनालय शुद्धी शोभायात्रा, जिनालय मानस्तंभ शुद्धी व प्रतिष्ठा अभिषेक झाले. दुपारी राजसभा, षटक्रम शिक्षा, सतानोत्पत्ती राज्याभिषेक भेट, वैराग्य प्रसंग, प्रवचन व आरती झाली. सायंकाळी आरती, शास्त्रस्वाध्याय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांत भरत-बाहुबली नाटिका सादर करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments