Homeताज्या घडामोडीपुणे ग्रँड टूर – २०२७ सीझन दोन

पुणे ग्रँड टूर – २०२७ सीझन दोन

जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा २६ ते ३१ जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

▪️पुणेकरांना अडचण होऊ नये म्हणून स्पर्धेची सुरुवात आणि समारोप सुट्टीच्या दिवशी

पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – २०२७’ (सीझन २) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२७ रोजी होणार असून समारोप ३१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप दोन्ही टप्पे सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आले असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मोशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे. या मार्गामुळे आधुनिक आयटी हब आणि निसर्गरम्य मुळशी परिसर यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.

स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत –
पहिला टप्पा (मोशी ते हिंजवडी) – दि. २६ जानेवारी २०२७ (मंगळवार)
दुसरा टप्पा (बारामती ते सासवड) – दि. २७ जानेवारी २०२७ (बुधवार)
तिसरा टप्पा (जुन्नर ते राजगुरुनगर) – दि. २८ जानेवारी २०२७ (गुरुवार)
चौथा टप्पा (आळंदी ते लोणावळा/खंडाळा) – दि. २९ जानेवारी २०२७ (शुक्रवार)
पाचवा टप्पा (लोणावळा/खंडाळा ते हिंजवडी) – दि. ३० जानेवारी २०२७ (शनिवार)
सहावा व अंतिम टप्पा (पीसीएमसी ते बाळगंधर्व रंगमंदिर) – दि. ३१ जानेवारी २०२७ (रविवार)

या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे.

स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

यावर्षी झालेल्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी ‘पुणे ग्रँड टूर – २०२७’ ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments