गिरीष भोपी, पनवेल,
चार ते आठ सप्टेंबर या कालावधीत पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.या विशेष मोहिमेदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेकडून रिक्षाचालक व इतर वाहतूक नियमभंगाच्या एकूण 1,320 कारवाया करण्यात आल्या असून, त्यामधून ₹9,50,250/- इतका दंड आकारण्यात आला.
तसेच प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांच्या वतीने एकूण 42 कारवाया करण्यात आल्या असून, या कारवाईदरम्यान ₹3,84,000/- इतका दंड आकारण्यात आला.
🚨 संयुक्त विशेष रिक्षा कारवाई
पनवेल शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त विशेष रिक्षा कारवाई मोहीम राबविण्यात आली.
नवीन पनवेल रेल्वे स्टेशन, एचडीएफसी तसेच आदई सर्कल, माथेरान रोड या ठिकाणी विशेष कारवाई करण्यात आली.
दिनांक 08 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 07.00 ते 11.30 वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक श्री. सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच श्री. अनिल गेळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संयुक्त कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेदरम्यान रिक्षामध्ये अनधिकृतपणे फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे, काळ्या काचा, विना हेल्मेट तसेच इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
📢 नागरिक व रिक्षाचालकांना आवाहन
पनवेल शहरातील सर्व रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. गणवेश परिधान करावा, मीटरप्रमाणे भाडे आकारावे, प्रवाशांशी नम्रपणे वागावे तसेच वाहन चालविताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करावे.
तसेच सर्व नागरिक व वाहनचालकांनीही वाहतूक शिस्त राखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये किंवा मोबाईलचा वापर करू नये. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करून सिग्नल जंप करू नये. वेगमर्यादेचे पालन करावे, चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये.
वाहतूक सिग्नल, लेन शिस्त आणि रस्त्यावरील इतर नियमांचे पालन करून स्वतःची तसेच इतर नागरिकांची सुरक्षितता जपावी. वाहतुकीचे नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून प्रत्येकाच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहेत.
🚦 “वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापरा, मोबाईलवर बोलू नका, सिग्नल जंप करू नका — सुरक्षित प्रवास करा!” 🚦



