अयोध्येत ७० एकर जागेवर भव्य श्रीराम मंदिर संकल्पनेचे पहिले कृतिशील उद्गाते विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड

77

देशाची सांस्कृतिक राजधानी अयोध्या येथील श्रीराम मंदिराची उभारणी हा ईश्वरीय संकेत आहे याचे आपण निमित्तमात्र आहोत.डॉ.एस.एन.पठाण

 

अनिल चौधरी,पुणे 

अयोध्येतील श्रीराम मंदिर हे अत्यंत भव्य असे ७० एकर जागेवर व्हावे व मुस्लीम धर्मीयांना ५ एकर जागा मशिदीसाठी उचितस्थळी मिळावी. असा संकल्प प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी २०१० पासूनच केला. अत्यंत संवेदनशील व धार्मिंक तेढ निर्माण करणारा प्रश्न सामोपचाराने सुटावा म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी पुणे, अयोध्या व दिल्ली येथे विविध धर्मीयांच्या परिषदांचे आयोजन केले. सर्वोच्च न्यायालयात ही संकल्पना मांडली. तसेच श्रीराम मंदिर व बाबरी मशीद विवादाच्या समाधानासाठी नेमल्या गेलेल्या मध्यस्थ समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती खलिफुल्ला यांनाही हा प्रस्ताव सादर केला. त्यांच्या या कृतिशीलतेला यश येऊन ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला व देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मा. उच्च न्यायालयाचा संपूर्ण सन्मान ठेवून म्हणावेसे वाटते की प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या या कृतिशील प्रयत्नातून अयोध्येत ७० एकर जागेवर भव्य श्रीराम मंदिर उभारले गेले. तसेच मुस्लीम धर्मीयांना मशिदीसाठी उचितस्थळी ५ एकर जागा देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. ते म्हणाले, ‘अरे, ७० एकर जागेवर मंदिर व्हावे, ही ईंश्वराचीच इच्छा होती. यामध्ये मी करणारा कुणीही नाही, मी केवळ निमित्त मात्र !’ या संबंधीचा सविस्तर लेख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.एस.एन.पठाण यांचा आहे.


२२ जानेवारी २०२४ रोजी ७० एकर जागेवर उभारले जाणारे भव्य श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामलल्लाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. संपूर्णं जगातील रामभक्तांच्या दृष्टीने हा अत्यंत भाग्याचा व आनंदाचा क्षण आहे. ही प्राणप्रतिष्ठा भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते व्हावी, हा जणू नियतीचा ईश्वरीय संकेत असावा.
श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनाचा इतिहास अतिशय प्राचीन आणि बोलका आहे. अनेक ज्ञात-अज्ञातांनी यात भाग घेतला. हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी १९८६ साली माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी रामजन्मभूमी-बाबरी मशीदीचे कुलूप उघडले. माजी उपपंतप्रधान श्री. लालकृष्ण अडवाणीजी, डॉ. मुरली मनोहर जोशी, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख डॉ. अशोक सिंघल, डॉ. राम विलास वेदांती यांनी काढलेली रथयात्रा, साध्वी ऋतंभरा, साध्वी उमा भारती यांच्यासकट, अगदी सुरुवातीपासूनच सक्रीय असणारे, भारताचे १४ वे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी, हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे, विष्णू हरी दालमिया, महंत अवैद्यनाथ, वेळप्रसंगी बलीदान देखील देणारे हजारो ज्ञात-अज्ञात कारसेवक, तसेच देश-विदेशातील विविध धर्मीय लक्षावधी रामभक्त-देशभक्त, अनेक शिस्तबद्ध संघ स्वयंसेवक, यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागाने साकार होणारे हे प्रभु श्रीराम मंदिर हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे सद्भावाचे, समन्वयाचे, बंधुभावाचे व मानवतेचे आस्थाकेंद्र होईल, यात शंका नाही.

श्रीराम मानवता भवन
सन २०१० सालची सत्य घटना. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पद्मभूषण डॉ. विजय भटकर व लेखक मुंबईला बैठकीसाठी निघालो होतो. लोणावळ्याच्या जवळे कराड सर म्हणाले, “डॉ. पठाण! हा पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेच आहे ना? का आपण रस्ता चुकलो?” तेव्हा मी म्हणालो, “हा एक्स्प्रेस हायवेच आहे.” मग कराड साहेब आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले,“अहो, मग रस्त्यावर एकही वाहन कसे नाही?” तो ३० सप्टेंबर २०१० चा दिवस होता. मी म्हणालो, “सर, आज ‘श्रीराम मंदिर-बाबरी मशीद विवादाचा मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने निकालानंतर देशात काहीही घडू शकते. दंगलही घडू शकते. म्हणून आज कुणीच प्रवासाची जोखीम घेतलेली दिसत नाही.” तेव्हा सर म्हणाले, “किती जागेचा वाद आहे?” मी म्हणालो, “२.७७ एकर आणि याचिकाकर्ते ३; म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला ०.९ एकर जागा यावयाची.” प्रा. कराड सर एकदम भावनिक झाले. ते म्हणाले, “काय झाले आहे या देशाला? अहो, ०.९ एकर जागेवर श्रीरामाचे मंदिर कसे होईल? मशिदीला तरी ती जागा पुरेल का? आणि झालाच कोर्टाचा निर्णय आणि दिली कुणा एकाला कमी-जास्त जागा तर काय आकाश कोसळणार आहे? श्रीरामाचे मंदिर बांधायचे असेल तर त्याला कमीत कमी ६० ते ७० एकर जागा लागेल. त्या २.७७ एकर जागेत काय होणार?” आणि आतापर्यंत शांत असलेले डॉ. विजय भटकर एकदम बोलले, खरे म्हणजे श्री रामाचे मंदिर, म्हणजे अखिल भारतीयांसाठी मानवता भवनच असेल. श्री रामाचे मंदिर भारतीयांसाठी मार्यादा पुरूषोत्तम. श्रीराम मानवता भवना यावर आमचे एकमत झाले. खरे म्हणजे अयोध्येच्या प्रश्नावर श्रीराम मंदिर विवादित जागेवर बांधावे हाच त्यावर तोडगा असू शकतो.”या संकल्पनेवर तिघांचेही एकमत झाले.


पुण्यातील बुद्धिजीवी परिषदेत एकमताने ठराव
मुंबईवरून परत आल्याबरोबर प्रा.डॉ. कराड सरांनी पुण्यातील निवडक शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ यांची बैठक बोलविली. या बैठकीत २५ ते ३० जण अत्यंत जाणकार व मोठी व्यक्ती उपस्थित होती. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण मा. डॉ. विजय भटकर, कै. मा. डॉ. मोहन धारिया, मा. पुणे महापौर श्री. राजपाल सिंग व इस्लामिक स्कॉलर पै. श्री. अनीस चिश्ती, आचार्य रतनलाल सोनग्रा इत्यादी विचारवंत, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. या विवादित जागेच्या प्रश्नावर दोन तास चर्चा झाल्यानंतर एकमताने ठराव पास केला की, ‘अयोध्या येथे विवादित जागेवर ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मानवता भवन/मंदिरा’ची निर्मिती व्हावी.’ हा ठराव त्या वेळचे मा. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मा. गृहमंत्री भारत सरकारपासून तर अगदी विश्व हिंदू परिषदेचे मा. अशोक सिंघल साहेब, मा. डॉ. राम विलास वेदांती महाराज इ. सर्वांना पाठविला. पुढे मा. कराड सरांनी या संकल्पनेवर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत काम केले. त्यांनी जणू या संकल्पनेचा ध्यासच घेतला होता.

सरसंघचालकांशी बैठक
सदरील बुद्धिजीवी परिषदेत ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम मानवता भवन/मंदिर’चा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर आपला हा विचार आपण सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या कानांवर घालू या, असा विचार आल्यानंतर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. विजय भटकर, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. एस. एन. पठाण यांच्या शिष्टमंडळांनी सरसंघचालक यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले. ही भेट श्री. नारायणराव मोहोड यांनी घडवून आणली होती. प्रस्तावाबद्दल समाधान व्यक्त करून मा. सरसंघचालक भागवत साहेब म्हणाले की, श्रीराम मंदिराचा निर्णय ‘साधू-संत संसद’ घेते व त्यामुळे मला हस्तक्षेप करणे अवघड आहे; परंतु मी वैयक्तिकरीत्या तुमच्या प्रस्तावाशी सहमत आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली.
मा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी जन्मगावी रामेश्वर (रुई), गावचा मंदिर-मशिदीचा प्रश्न हिंदू-मुस्लीम यांच्या सहकार्यामुळे सोडविल्यानंतर ‘श्रीराम मंदिर-बाबरी मशिद’ हा विवादाचा प्रश्न थेट अयोध्या येथे जाऊन अभ्यासावा, असा विचार केला. २४ मे २०१४ रोजी ७ लोकांचे शिष्टमंडळ अयोध्येला रवाना झाले. यात डॉ. कराड सर, डॉ. विजय भटकर, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. सुचित्रा नागरे व मी स्वतः होतो.
१०० कोटी हिंदू लोकांच्या आस्थेचा विषय असलेल्या व श्रद्धा असलेल्या श्रीरामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी प्रवेश करताना कडक सुरक्षा होती. प्रत्येक माणसाला तपासूनच आत सोडले जात होते. येथील रस्ता एखाद्या लोखंडी पिंजर्‍यातून जातोय असे जाणवले. याशिवाय लोखंडी रस्त्याच्या बाहेरून आमच्याबरोबर बंदूकधारी संरक्षक चालत होते. अशी व्यवस्था कशी याचे नवल कुणालाही वाटावे अशीच अवस्था होती. त्या संपूर्ण संरक्षण व्यवस्थेचा एक प्रकारचा मनावर ताणच येत होता.
कराड साब! आपको जल्दी आना था!
“या विवादामध्ये कोर्टात पहिली याचिका अयोध्या येथील रहिवासी हाशीम अन्सारी यांनी दाखल केली होती. तेव्हा त्यांच्या घरी गेलो. बैठक हॉलमध्येच अन्सारी साहब ‘शरपंजरी’ पडल्यासारखे जाणवले. तेव्हा कराड साहेब म्हणाले, “अन्सारी साहब, आज रामलल्लाका दर्शन लेते वक्त मन उदास था. श्रीराम मंदिर थोडा एक या दो एकर में होता है! उसके लिए तो ६०-७० एकर जमीन चाहिए.” मा. कराड साहेबांचे बोल ऐकून अन्सारी साहेबांनी मा. कराड साहेबांचा हात हातात घेऊन बोलले, “कराडसाब, आपको जल्दी आना था. आपने आने में देर की. अभी रामलल्लाको मैं धूप में देख नहीं सकता.” आणि असे म्हणून ते रडू लागले. श्रीराम मंदिरासाठी रडणारे हाशीम अन्सारी पाहिल्यानंतर मा. कराड साहेबांनाही रडू आवरेना.


ज्येष्ठ पत्रकार श्री. शीतलासिंग यांचा सहभाग
त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही छोटासा परिसंवाद आयोजित केला होता व अयोध्या आणि फैजाबादमधील सर्व पत्रकारांना निमंत्रित केले होते. येथील सर्वात वरिष्ठ पत्रकार शीतलासिंग हे सुरुवातीपासूनच्या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत. त्यांनी बाबरी मशिदीचा संपूर्ण इतिहास कथन केला व बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाल्यानंतर ७ जानेवारी १९९३ रोजी पार्लमेंटने कायदा करून विवादित जागेभोवतालची ६७.३ एकर जागा संपादित केली आहे ही माहिती दिली.
ही जागा श्रीराम न्यासला श्रीराम मंदिरासाठी परत द्यायची असेल तर भारत सरकारलाच तो निर्णय घ्यावा लागेल, असे श्री. शीतलासिंग म्हणाले. मा. कराड साहेबांना ही माहिती अतिशय उपयुक्त वाटली व असे असेल तर ६७.३ एकर जागा केंद्र सरकारने श्रीराम मंदिरासाठी खुली करावी, हा विचार मा. कराड सरांच्या मनात अधिक बळकट झाला. पुढे श्री. शीतलासिंग विश्वशांती केंद्राशी जोडले गेले.
विश्वशांती केंद्र सर्वोच्च न्यायालयात
२१ मार्च २०१७ रोजी ‘श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीचा प्रश्न कोर्टाच्या बाहेर सोडवावा असा प्रथमच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्या वेळी विश्वशांती केंद्राच्या वतीने मा. प्रा. डॉ. कराड सरांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने आमचे सर्व म्हणणे ऐकून घेतले होते, परंतु इतक्या उशिरा याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला. संपादित केलेली ६७.५ एकर जागा सरकारने मंदिरासाठी खुली करावी, असा मुद्दा मा. कराड साहेबांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयापुढे त्या वेळी आग्रहाने मांडण्यात आला होता. दुर्दैवाने तीनही याचिकाकर्ते म्हणजेच रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यामध्ये कोणताही समझौता न झाल्यामुळे शेवटी मध्यस्थ समिती नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला.


दिल्लीत परिषदेचे आयोजन
दिल्ली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब, मध्ये आयोजित गोलमेज परिषदेत डॉ. एस. एन. पठाण, मा. आरिफ महंमद खान, मा. वेदप्रताप वेदिक, श्री. रामविलास वेदांती महाराज, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, मा. डॉ. विजय भटकर व मा. श्री. वहिदुल्ला अन्सारी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, जगामधील विविध धर्मांचे आश्रयस्थान असणार्‍या भारत देशाला भारतीय संस्कृतीचा आदर्श जगापुढे ठेवावयाचा असेल व २१व्या शतकात भारत हा ‘विश्वगुरू’ होणार आहे हे ध्यानात घेऊन अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर सरकारने अधिगृहित केलेली ६७.३ एकर जागा अधिक विवादित २.७७ एकर जागा अशा एकूण ७० एकर जागेवर ‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन’ उभारून एक आंतरराष्ट्रीय भव्य स्मारक निर्माण करावे. यावेळी सुद्धा अयोध्येत ७० एकर जागेवर भव्य श्रीराम मंदिर (श्रीराम भवन) बांधावे व मुस्लीम धर्मीयांसाठी ५ एकर जागा द्यावी, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
भव्य श्रीराम मंदिराचा विचार मा. प्रा. डॉ. कराड सरांनी अनेक बुद्धिवंतांपुढे मांडला आणि देशातील थोर विचारवंत, शास्त्रज्ञ, जेष्ठ पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ यांचे ३० लोकांचे शिष्टमंडळ प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांच्या नेतृत्वाखाली ८ जानेवारी २०१८ रोजी अयोध्येला रवाना झाले.
या वेळी या शिष्टमंडळात प्रा. डॉ. वेदप्रताप वेदिक, श्री. आरिफ महंमद खान, श्री. अनीस चिश्ती, डॉ. झुनझुनवाला, श्री. फिरोज बख्त अहमद, डॉ. कमल टावरी, डॉ. विजय भटकर, अ‍ॅड. शिराज कुरेशी, डॉ. सुभाष आवळे व स्वतः लेखक डॉ. एस. एन. पठाण इ. यांचा समावेश होता.
(नि.) न्यायमूर्ती मा. खलिफुल्ला समितीला प्रस्ताव सादर
१८ मार्च २०१९ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने (नि.) न्यायमूर्ती खलिफुल्ला साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मेडियेशन (मध्यस्थ) समिती नेमली. मा. कराडसाहेबांनी त्वरित मा. खलिफुल्ला समितीस विश्वशांती केंद्रातर्फे ७० एकर जागेवर भव्य श्रीराम मंदिर व्हावे व ५ एकर जागा ‘पवित्र कुरान ज्ञानभवन’ अर्थात मशिदीसाठी देण्यात यावी, असा प्रस्ताव विश्वधर्मी ‘श्रीराम मानवता भवन’ या नावाने सादर केला. विशेष म्हणजे १५ जून २०१९ रोजी (नि.) न्यायमूर्ती मा. खलिफुल्ला साहेबांनी आम्हांला भेटीसाठी लखनौ येथे बोलविले. त्या वेळी मा. (नि.) न्यायमूर्ती खलिफुल्ला समितीसमोर मा. डॉ. विश्वनाथ कराड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विजय भटकर, श्री. आरिफ महंमद खान, डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. राजीव शारदा, डॉ. अनामिका वडेरा आणि मी स्वतः डॉ. एस. एन. पठाण आम्ही हजर होतो. मा. कराड साहेबांनी ‘श्रीराम मानवता भवन’चा प्रस्ताव सविस्तर मांडला. प्रस्ताव ऐकल्यावर सदर प्रस्ताव अत्यंत ‘अभ्यासपूर्ण प्रस्ताव’ असून, ‘परिपूर्ण प्रस्ताव’ आहे, असे उद्गार मध्यस्थ समितीचे अध्यक्ष नि. न्यायाधीश मा. खलीफल्ला साहेबांनी काढले.
पेरलेल्या सुमधुर बीजाचे वटवृक्षात रूपांतर झाले
यानंतर मा. मुख्य न्यायाधीश मा. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने की ज्यामध्ये मा. न्यायमूर्ती शरद बोबडे, मा. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, मा. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि मा. न्यायमूर्ती अब्दुल नझीर या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी निर्णय दिला. अनेक वर्षांपासून देशाच्या मानगुटीवर बसलेला हा प्रश्न कायमचा निकाली निघाला. “न्यायालयीन निर्णयात पहिला भाग होता केंद्र सरकारने सभोवतालची संपादित केलेली ६७.३ एकर जागा व विवादित २.७७ एकर जागा अशी एकूण ७० एकर जागा श्रीराम मंदिरास द्यावी व महत्त्वपूर्ण जागेवर मुस्लीम बांधवांच्या प्रार्थनास्थळासाठी ५ एकर जागा देण्यात यावी.”
सर्वोच्च न्यायालयाचा वरील निर्णय येताच १३० कोटी जनतेने निःश्वास सोडला. कारण सर्व देशाने हा निर्णय मान्य केला. मा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो व त्याला ‘लॉ ऑफ दी लॅण्ड’ म्हणतात.
परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान ठेवून व त्यांची क्षमा मागून म्हणावेसे वाटते की, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी मध्यस्थ समितीला केलेल्या दोन्ही सूचनांचा मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अंतिम निर्णयात समावेश केला होता हे मात्र अगदी खरे, मा. कराड सरांनी पेरलेल्या सुमधुर बीजाचे वृक्षात रूपांतर झाले होते, या सर्व घटनांचा मी स्वतः पहिल्यापासून साक्षीदार आहे. मा. कराड सरांनी जीवनभर आळंदी हे ज्ञानाचे तीर्थक्षेत्र, अजमेर हे मानवतेचे क्षेत्र, अमृतसर हे शक्ती आणि भक्तीचे केंद्र आणि अयोध्या ही भारताची सांस्कृतिक राजधानी यासाठी ते जीवनभर कार्य करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा मा. डॉ. कराड साहेब व एमआयटी विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे, भारतच्या आम्हा सर्व पदाधिकार्‍यांना आनंद झाला होता.