Homeताज्या घडामोडीमहात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांनी शिक्षणाला नवी दिशा

महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांनी शिक्षणाला नवी दिशा

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त ग्रुपमध्ये महात्मा फुले यांची २०० वी जयंती साजरी

पुणे: “महात्मा फुले यांचे विचार हे आजच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे आहेत. शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवण्याची त्यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. सूर्यदत्त परिवार हा त्यांच्या विचारांवर चालत विद्यार्थ्यांना केवळ शिक्षित नव्हे, तर सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि परिणामकारक योगदानाबद्दल डॉ. रवी चौधरी यांना ‘सुर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षीत कुशल,  अधिष्ठाता डॉ. प्रतिक्षा वाबळे, डॉ. केतकी बापट, डॉ. सिमी रेठरेकर, डॉ. सारिका झांबड यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अत्यंत भव्य, दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजप्रबोधन, स्त्रीशिक्षण, शेतकरी व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याला अभिवादन करत हा सोहळा विचारांचा खरा जागर ठरला. संपूर्ण परिसर शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन या संदेशाने भारून गेला.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले की, केवळ पदवी मिळवणे हेच उद्दिष्ट नसून, समाजासाठी संवेदनशील नागरिक घडणे ही खरी शिक्षणाची फलश्रुती आहे. सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाबरोबरच संस्कार, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी रुजवली जात असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. सकारात्मक दृष्टीकोन, समर्पण, मूल्याधिष्ठित जीवन आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रभावी संदेश त्यांनी दिला.
डॉ. रवी चौधरी म्हणाले, “महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या विचारांनीच मला शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा दिली. शिक्षण हे केवळ करिअर घडवण्याचे साधन नाही, तर ते समाज बदलण्याची शक्ती आहे. प्रत्येक विद्यार्थी हा परिवर्तनाचा वाहक आहे. त्याने स्वतःबरोबर समाजालाही उन्नत करण्याचा संकल्प केला पाहिजे.”

विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरणे, विचारमंथन आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम सादर केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, ऊर्जादायी आणि विचारांना चालना देणारा ठरला. सूत्रसंचालन डॉ. सुनील धनगर यांनी केले. राष्ट्रप्रेमाच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या वंदे मातरमने समारोप करण्यात आला.
———————
डॉ. रवी चौधरी यांना ‘सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करतेवेळी स्नेहल नवलखा, डॉ. प्रतिक्षा वाबळे, डॉ. केतकी बापट, डॉ. सिमी रेठरेकर, डॉ. सारिका झांबड व श्री. अक्षीत कुशल  डॉ. समीर पटेल आदी.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments