मुंबई प्रतिनिधी
वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
ज्या वस्तूंचा कर दर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतका कमी करण्यात आला त्यात प्रामुख्याने प्लायवूड, वीनीयर पॅनल्स, तत्सम लॅमिनेटेड लाकूड, स्टोव्ह( केरोसीन व एलपीजी स्टोव्ह वगळता),हातातील घड्याळे,पॉकेट व इतर घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलर, दुधाच्या कुलरसह रेफ्रिजरेटिंग किंवा अतिशीत उपकरणे, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लीनर, ६८ सें.मी पर्यंतचे दूरदर्शन संच, ३२ इंचापर्यंत स्क्रीन असलेले मॉनिटर, यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.
पॅकेज केलेले पेयजल, कंडेन्स्ड मिल्क, शेतीच्या मशागतीसाठी, वनीकरणासाठी किंवा लागवडीसाठी लागणारे यंत्राचे भाग, तसेच लॉन किंवा स्पोर्टस ग्रांऊड रोलर्स, मुख्य कंत्राटदाराला उप कंत्राटदाराद्वारे प्रदान केलेल्या वर्क्स कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसेस यांचा कर दर १८ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आला.
१८ आणि १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधे असलेल्या संगणक सॉफ्टवेअर, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी (सीडी रॉम),रेकॉर्ड केलेले मॅग्नेटिक टेप, मायक्रोफिल्मस, मायक्रोफिचेस, घरगुती वापरामध्ये येणारे एलपीजी, १००० रुपये प्रति जोडी पर्यंत किंमत असणारे पादत्राणे, यासारख्या वस्तूंचे कर दर कमी होऊन ते ५ टक्के इतके झाले. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर दर १२ टक्क्यांहून ५ टक्के इतका कमी करण्यात आला. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर, किंवा चार्जिंग स्टेशन यावरील कर दर १८ टक्क्यांहून ५ टक्के इतका कमी करण्यात आला. भारत सरकारने पुरस्कृत केलेल्या धार्मिक यात्रेकरुंसाठी विमान प्रवासावरील कर दर ५ टक्के (इनपुट सर्व्हिसेसवरील आयटीसीसह) करण्यात आला.
कोणत्याही भाषेतील नाट्य क्षेत्रातील संगीत, नृत्य, नाटक, ऑर्केस्ट्रा, लोक किंवा शास्त्रीय कला यासारख्या सर्व नाट्य सादरीकरणाच्या प्रवेशासाठीच्या तिकिटांच्या किंमतीवरील जीएसटी दराची सूट मिळण्याची मर्यादा २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढवण्यात आली.
१०० रुपयांपर्यंत किंमत असलेल्या सिनेमा तिकिटावरील कराचा दर १८ टक्क्यांहून १२ टक्के आणि १०० पेक्षा जास्त किंमत असलेल्या सिनेमा तिकिटाचा कर दर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतका कमी करण्यात आला. महिलांची आरोग्य विषयक सुरक्षितता आणि स्वच्छता लक्षात घेऊन सॅनेटरी नॅपकिन्स करमुक्त करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर दर कपातीमुळे कर अनुपालनात वाढ होऊन त्याचा परिणाम महसूल वृद्धीत होईल असा विश्वास वित्तमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला असून कर दर कपातीमुळे सर्व सामान्य माणसाला आणि व्यापार-उद्योग जगताला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.