पुणे प्रतिनिधी,
मावळ तालुक्यातील भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये वर्षा पर्यटनासाठी मनाई असल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या सर्वात जास्त पाऊस होणा-या तालुक्यामध्ये असणा-या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठया प्रमाणात नागरिक वर्षापर्यटनासाठी येत असतात. पाऊस सुरु झाल्यानंतर मुंबई व राज्याच्या इतर जिल्हयातून अनेक पर्यटक वर्षापर्यटनासाठी येत असतात. मावळ तालुक्यातील भुशी डॅम व लोणावळा परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गड किल्ले परिसर व वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर येथे दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. यापूर्वी धरण परिसरात व इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
या धरण क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने भुशी डॅम व इतर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून अचानक पाण्याचा विसर्गात वाढ होत असते. अचानक पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने पाण्यात पर्यटक वाहून मयत होण्याच्या घटनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक पर्यटक यांच्याकडून मद्यपान व हुल्लडबाजीच्या घटना देखील मोठया प्रमाणात घडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे व इतर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या कारणामुळे मागील दोन वर्षामध्ये भुशी धरण व इतर धरणामध्ये बुडून जीवित हानी झालेली आहे. यावर्षी कोरोना आजाराच्या अनुषंगाने व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घालणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 (2) (3) (4) अन्वये जिल्हयात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी करण्यात येत आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
0000