अनिल चौधरी, पुणे
पुण्यात नुकताच भारतीय शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा ‘नृत्योत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ते २९ एप्रिलदरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील नृत्यप्रेमींनी सहभाग घेतला. ताल, परंपरा आणि कलात्मकतेने भरलेल्या या सोहळ्याने पुणेकरांची मनं जिंकली.
शिवांजली डान्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सिनिअर, ज्युनिअर, सब-ज्युनिअर, सोलो, ड्युओ आणि ग्रुप अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. विशेषतः भरतनाट्यम आणि कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांनी रंगमंच उजळून निघाला.
या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगन आणि परीक्षक गौतम मराठे यांनी केले.
३० एप्रिल रोजी बालबंधर्व रंग मंदिर येथे स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यावेळी हांडेवाडी परिसरातील वीरांगना सिंह हिने ज्युनिअर सोलो भरतनाट्यम गटात प्रथम उपविजेतेपद पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. वीरांगना ही युरोस्कूल मधील इयत्ता तिसरी ‘ई’ची विद्यार्थिनी असून नृत्यांअमृता अकॅडमि ऑफ परफॉरमिंग आर्टस् येथे नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे.
प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षिका आयुषी बालाईया यांच्या मार्गदर्शनाखाली वीरांगनाने केलेल्या सादरीकरणाने परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणात भावमुद्रा, कथनशैली आणि तांत्रिक अचूकता यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना गौतम मराठे म्हणाले, “अवघ्या पाच वर्षांच्या मुलांकडून इतक्या अवघड शास्त्रीय नृत्य सादरीकरण पाहून मला अतिशय आनंद झाला. इतर गटांतील स्पर्धकांनीही उत्कृष्ट कामगिरी केली, मात्र इतक्या लहान वयात भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणारी ही प्रतिभा डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.”
ते पुढे म्हणाले, “अशा लहान वयातील कलाकारांना आणि भारतीय शास्त्रीय नृत्यकलेला प्रोत्साहन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वयात प्रशिक्षण मिळाल्यास ही मुले भविष्यात नृत्यक्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात.”
‘नृत्योत्सव २०२६’ ही केवळ स्पर्धा नव्हती, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि नव्या पिढीच्या कलागुणांचा संगम ठरली. अशा उपक्रमांमुळे भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन आणि संवर्धन होण्यास निश्चितच मोठी मदत होत आहे.



