प्रशांत नाकती म्हणतोय. “काय मौसम काय झाडी काय डोंगर तरी पण तुमचा भाऊ हाय सिंगल”; सोशल मिडीयावर वाढतेय ‘मी सिंगल’ची क्रेझ
कोणी एके काळी अशी वेळ होती जेव्हा बघू तिकडे कपल्स असायचे…पण आता असं वाटू लागलंय की सिंगल्सचा जमाना आला आहे… ‘सिंगल आहे आणि मिंगल व्हायची नितांत गरज आहे’, अशा कित्येकांच्या भावना नक्कीच असतील आणि हे अचूक कळलंय ‘मिलिनिअर प्रशांत नाकती’ यांना.
नुकतंच, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक भन्नाट गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले आहे ज्याचे नाव आहे ‘मी सिंगल’. गाण्याच्या शिर्षकावरुनच गाण्याचा विषय अनेकांना कळला आहे आणि तो विषय फारच खोल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. “काय मौसम काय झाडी काय डोंगर तरी पण तुमचा भाऊ हाय सिंगल”, या ओळीने ‘मी सिंगल’ गाण्याची सुरुवात होते. सुरुवातच इतकी भारी केली आहे की संपूर्ण गाणं पाहताना एक वेगळीच मजा येते. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या म्युझिकल जोडीने हे गाणे गायले असून या गाण्यात गौरी पवार म्हणजेच बिनधास्त मुलगी, निक शिंदे आणि रितेश कांबळे यांनी टीनएजर्सची भूमिका साकारली आहे जे सिंगल आहेत आणि त्यांना हवी आहे प्रेमळ जोडीदाराची सोबत. त्यांना हवा असणारा त्यांच्या मनासारखा जोडीदार तिघांपैकी कोणाला पहिले भेटला आणि कोण अजूनही जोडीदार शोधतोय हे गाणं पाहिल्यावर तुम्हांला कळेलच.
रोहित जाधव दिग्दर्शित या गाण्याचे शब्द प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. या गाण्याचे शूटिंग नाशिकमध्ये करण्यात आले असून सुंदर पावसाच्या दिवसांत, हिरवळ, नैसर्गिक सौंदर्यात शूट झाले आहे. बिनधास्त मुलगी उर्फ गौरी पवार हिचा हा पहिलाच म्युझिक अल्बम आहे. म्युझिक अरेंजर संकेत गुरव ह्यांनी केले असून, सर्व कलाकारांनी एमकेकांना सहकार्य करुन अतिशय हलक्या-फुलक्या, आनंदी वातावरणार गाण्याचं शूट पूर्ण केलं.
प्रशांत नाकती यांची प्रत्येक गाणी ही सुपरहिट होतातच… ‘मी सिंगल’ गाण्याच्या टीझरला पण १ लाख पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आता हे संपूर्ण गाणं देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या गाण्याच्या शेवटी प्रशांत नाकती यांनी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे आणि ती बातमी म्हणजे TO BE CONTINUE म्हणजेच ‘मी सिंगल’चा दुसरा भाग पण येण्याच्या मार्गावर आहे.
या गाण्याची विशेष खासियत अशी आहे की पडद्यावर दिसणारे आणि पडद्यामागील कलाकार हे सिंगलच आहेत. त्यामुळे ती सिंगल असण्याची भावना काय असते ते टीम मेंबर्सला माहित आहे आणि ब-याच प्रेक्षकांनाही ती या गाण्यातून जाणवत असेल. “प्रत्येकाला योग्य असा जोडीदार मिळावा आणि त्यांनी सुखात, आनंदात राहावं” हीच ‘मी सिंगल’च्या टीमची इच्छा!