आंबवणे ग्रा. पं. चे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी विरोधकांवर डागली तोफ
पुणे –
मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की, माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले ते पूर्णपणे बिनबुडाचे असून, माझ्यावर आरोप करणारे स्वतःच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आदिवासींच्या, देवस्थानच्या जमिनी बळकावण्याचे प्रताप केलेले आहेत. तसेच ग्रामसेवक शिंदे यांच्या मदतीने बोगस बिले काढण्याचा प्रयत्न केला आहे. या सदस्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच ते माझ्यावर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत, अशी तोफ माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी आपल्या विरोधकांवर डागली आहे.
आंबवणे ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी कराळे यांच्यावर जे आरोप केले, त्या सर्व आरोपांचे उत्तर कराळे यांनी दिले. कराळे यांचे म्हणणे आहे की, मी स्वतः गेल्या ३०-३५ वर्षांपासून बांधकाम व्यवसायाला लागणारे साहित्य विक्रीचा व्यवसाय करतो आहे. माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे किंवा निधी वाटपात घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. ग्रामपंचायतीला आदिवासी, अपंग, बालकल्याण अशा विविध हेड खाली निधी येत असतो. त्या निधीत कुठेही गैरप्रकार करण्यात आलेला नाही.
कराळे म्हणाले की, माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे की, मी माझ्या मर्जीतील कंत्राटदारालाच काम देतो तो पूर्णपणे खोटा आहे. उलट माझ्या कार्यकाळात पाच ते सहा काँट्रॅक्टर कार्यरत होते. सर्व कामे ई-निविदा पद्धतीने टेंडरिंग करून काढण्यात आली. ज्यांचे टेंडर हे सर्वांत कमी, त्याच कंत्राटदाराला काम देण्यात आलेले आहे.
याशिवाय माझ्यावर जो रस्त्याच्या घोटाळ्या संदर्भात आरोप करण्यात आला तो पूर्णपणे बिनबुडाचा असून, विरोधकांनी म्हटले आहे की, रस्त्याची अंगणे केली जातात, ते साफ खोटे आहे. उलट ती अंगणे नसून तो मुख्य रस्ताच आहे. त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे.
२७ लाख रुपयांचा रोड मी केवळ कागदोपत्री केल्याचा या सहा सदस्यांचा आरोप आहे, परंतु कोणीही येऊन प्रत्यक्षात ते काम पहावे. ते काम नियमानुसार करण्यात आलेले आहे. त्याची कागदपत्रे कोणालाही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार जेंव्हा पैसे मागण्यासाठी आला असता, त्याला पैसे देण्यास या सहा सदस्यांनी विरोध केला, तसेच त्याला अज्ञात स्थळी बोलावून तब्बल सहा लाख रुपयांची लाच मागितली, ज्याचे पुरावेदेखील माझ्याकडे आहेत, असा आरोप मच्छिंद्र कराळे यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणी सदस्यांना बेकायदेशीरपणे पैसे देऊ नये, असे सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांनी संबंधित कंत्राटदाराला सांगितले. तसेच या प्रकरणाची फाईल व तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन धादांत खोटे आरोप करणाऱ्या सदस्यांनीच संबंधित कंत्राटदारास ६ लाख रुपयांची लाच मागितल्याचा माझ्याकडे आॅडिओ आणि व्हिडिओ पुरावा आहे. त्यामुळे हे लाचेचे प्रकरण समोर येऊ नये, यासाठी संबंधित सदस्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, असे कराळे यांचे म्हणणे आहे.
*माझ्यावर आरोप करणारेच भ्रष्टाचारी : मच्छिंद्र कराळे*
माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी पुढे सांगितले की, ग्रा. पं. सदस्य अक्षरा दळवी यांचे पती गणेश दळवी हे ग्रामपंचायतीत कारकून आहेत. त्यांनी ग्रामसेवक शिंदे यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीचा कुठलाही ठराव न घेता अनधिकृतरित्या ग्रामपंचायतीचे दप्तर बाहेर नेले. तसेच चुकीच्या पद्धतीने रिसाॅर्ट व जागेवर घर नसतानादेखील बेकायदेशीररित्या घरांच्या नोंदी केल्या. आदिवासींच्या जागांची परस्पर विक्री करण्यासाठी लागणारे एन ओ सी देण्यात आली व तसे दाखले ग्रामपंचायतीत बनवण्यात आले. हा घोटाळा जेंव्हा विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांच्या लक्षात आला तेंव्हा त्यांनी त्यास विरोध केला व चुकीचे काम केल्याबद्दल ग्रामसेवक शिंदे यांची तक्रार गटविकास अधिकारी मुळशी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामसेवक शिंदे यांची सध्या चौकशी सुरू आहे.
ज्या सहा सदस्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यापैकी एक लोहकरे हे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केली आहे. या विषयाची तक्रार झाल्यानंतर त्यांचे सदस्यपद रद्द करण्यात आलेले आहे. आरोप करणाऱ्यांपैकी एक सदस्य नीलेश मेंगडे हा स्वतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो व त्यांचे नातेवाईक यांनी कुंभेरी, पेठ शहापूर व विसाघर येथील देवस्थान परिसरातील आदिवासींच्या जागा ग्रामसेवक शिंदे याला हाताशी धरून व बोगस दाखले बनवून हडपण्याचे पाप केलेले आहे. याशिवाय नीलेश मेंगडे हा स्वतः लेबर कॉन्ट्रॅक्टर असून, ॲम्बी व्हॅली येथे लेबर सप्लायचे काम करत आहे. दरम्यान त्याने आजवर बऱ्याच लेबर लोकांचे पेमेंट थकवले असून, गेली पाच ते सहा वर्षे झाले अद्यापही कामगारांना वेतन दिलेले नाही. त्यामुळे नीलेशने माझ्यावर आरोप करण्यापूर्वी एकदा स्वतःच्या भ्रष्टाचाराकडे पहावे, असा खोचक सल्ला कराळे यांनी दिला आहे.
या सर्व सदस्यांचे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच हे सहा सदस्य माझ्यावर सूडबुद्धीने आरोप करीत आहेत. आरोप करणाऱ्या सदस्यांनी माझी पत्नी सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्याविरोधात पौड पोलिस स्टेशनला या सदस्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोप करणारे सदस्य हे गावात सुरू असलेली विकास कामे विनाकारण सूडबुद्धीने रोखण्याचे काम करीत आहेत, त्यामुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. यासंदर्भात पत्रकारांनी व प्रशासनाने लक्ष देऊन माझ्यावर आरोप करणाऱ्या सदस्यांच्या बोगस कामांची व भ्रष्टाचाराची शहानिशा करावी, ही विनंती.
*- मच्छिंद्र कराळे*
*माजी सरपंच, आंबवणे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे.*
याबाबत आम्ही आंबवणे गावचे उपसरपंचाशी प्रतिक्रिया बाबत संपर्क केला असता तो झाला नाही —-————-