पीडित जुवेरिया रियाज शेख यांनी पत्रकार परिषदेत मांडली आपबिती
अनिल चौधरी, पुणे –
घर मालकाने जबरदस्तीने घरातील सामान बाहेर फेकून देत घरातील सदस्यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यासंदर्भातील तक्रार लष्कर पोलिस स्टेशनला देऊनसुद्धा पोलिस आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच धाकदपट करीत आहेत. एक प्रकारे आरोपींना पोलिस पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप पीडित तरुणी जुवेरिया रियाज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद पत्रकार भवन येथे आयोजित केली होती. यावेळी पीडित जुवेरिया पुढे म्हणाल्या की, ती आणि तिचे कुटुंबीय आई तबस्सूम रियाज शेख, वडिल रियाज शेख, धाकटी बहीण राहिला, जोया, मरियम तसेच धाकटा भाऊ मुसा, असे सगळे जण फ्लॅट नं. १०५, स्टर्लिंग हाऊस, काॅन्व्हेंट स्ट्रीट, कॅम्प पुणे येथे राहत आहेत. मी सध्या आबेदा ईनामदार काॅलेजमध्ये बीएचे शिक्षण घेत आहे. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहतो, त्याचा भाडेकरार आॅक्टोबर २०२४ मध्ये संपला आहे. त्यामुळे आम्हाला घर मालक घर खाली करण्यास सांगत आहे. त्यासंबंधीचा आमचा वाद सुरू आहे. दि. २१ जानेवारी रोजी मी सायंकाळी ७.३० वाजता क्लासवरून घरी आली असता, आमच्या घरातील सर्व सामान बाहेर काढून ठेवलेले मला दिसून आले. मी फ्लॅटजवळ गेली असता आमच्या घराला लागलेले कुलूप तोडलेले दिसून आले. मी त्यानंतर बाहेरील सामान घरात ठेवत असताना त्या ठिकाणी एक महिला आली व तिने मला जोरदार धक्का देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आणखी दोन जण आमच्या घरात गेले आणि त्यांनी उरलेले सामान बाहेर काढण्यास सुरवात केली. मी त्यांना याबाबतचा जाब विचारला असता, जफर कुरेशी याच्या पुतण्याने मला जोरदार धक्का दिला व मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तसेच मला बलात्काराची धमकी दिली. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतर महिलांनी माझे केस धरून ओढले व मला मारहाण करण्यास सुरवात केली. एव्हढेच नाही तर माझी धाकटी बहीण राहिला घरात कोंडून जबर मारहाण केली. त्यामुळे माझी बहीण जोरजोरात रडू लागली.
मी तात्काळ घडलेला प्रकार माझी आई तबस्सूम हिला फोनवरून सांगितला. काही वेळानंतर मी घरात गेली असता, घरातून २५ तोळे सोन्याचे दागीने घरात दिसून आले नाहीत, तसेच आम्ही एक मांजरीचे पिल्लू पाळले होते, तेदेखील आढळून आले नाही. मारहाण करणाऱ्या आरोपींनी माझ्या बहिणीलादेखील खूप त्रास देत तिला चटके देण्याची धमकी दिली.
त्यानंतर मी, माझी आई व कुटुंबीयांनी लष्कर पोलिस स्टेशनला जाऊन जफर कुरेशी, शमा कुरेशी व त्यांची वहिनी, पुतण्या या लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. लष्कर पोलिसांनी कलम ३२ (३), ३२९ (४), ३०५, ७४, १२६ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. माझी धाकटी बहीण प्रचंड भेदरलेली आम्हाला दुसऱ्या दिवशी दिसून आली. तेंव्हा तिने तिला जबर मारहाण झाल्याचे सांगितले. जेंव्हा आरोपींनी माझ्या बहिणीला घरात घेऊन आतून दार लावून घेतले, त्या वेळी तिला आरोपींनी चटके देण्याची धमकी दिली, असल्याची माहिती माझ्या बहिणीने दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हे अनेकदा पोलिस स्टेशनला येऊन गेले. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. आम्ही यासंदर्भात माहिती पोलिसांना विचारली असता, त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगावकर साहेबांना भेटण्यास सांगितले. आम्ही दिगावकर साहेबांना भेटलो असता, त्यांनी सांगितले की आम्ही आरोपींना अटक केली तर ते लगेच सुटतील. तुमची केस टिकणार नाही. कुणाला अटक करायचे त्याचा शहाणपणा आम्हाला शिकवू नको. तू आता त्या घरात पुन्हा गेली तर तुझ्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी मला व माझ्या कुटुंबीयांना दिली.
यावरून हे स्पष्ट आहे की, लष्कर पोलिस स्टेशनचे अधिकारी हे आरोपींना पाठीशी घालत आहेत. माझे कुटुंबीय प्रचंड घाबरून गेले आहेत व तणावाखाली जगत आहेत. आम्ही आज रस्त्यावर रहायला मजबूर आहोत. सहा दिवस होऊनही आरोपींना अटक केली जात नाही. तरी कृपया आपणास विनंती आहे की, माझी ही आपबिती आपल्या वर्तमानपत्रातून, आपल्या चॅनेलवरून प्रसिद्ध करावी मला न्याय देण्याचे करावे.
याबाबत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही….
सदर घरमालक यांच्याशी देखील वारंवार फोन करून, मेसेज करून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.