चाकरी, भाकरी आणि कष्टकऱ्यांच्या कवितांनी रंगवली मैफिल
अनिल चौधरी, पुणे,
: ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्रातील जवळपास हजारो साहित्यिक दिल्ली येथे संमेलनासाठी उपस्थिती राहणार आहेत. दिनांक २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या संमेलनासाठी पुण्यातून विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. महादजी शिंदे यांचे नाव या विशेष साहित्ययात्री रेल्वेला दिले आहे. विशेषतः १५०० साहित्यिकांना दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनासाठी ही विशेष रेल्वे सुविधा आहे. यामध्ये जगातील पहिले साहित्य यात्री संमेलन पार पडत आहे. धावत्या रेल्वेतील साहित्ययात्री साहित्य संमेलनात साहित्यिक विविध साहित्य प्रकारांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव करत दिल्ली दारी चालले आहेत. महाराष्ट्राच्या बहुसांस्कृतिक साहित्याचे दर्शन या संमेलनात पाहायला मिळत असून पोवाडे, कीर्तन, भारुड, कविसंमेलन यांच्या माध्यमातून साहित्यिक व्यक्त होत आहेत. याच वेळी या साहित्ययात्री धावत्या ट्रेन मधील संमेलनात एक परिवर्तनवादी विचारांचे उत्स्फूर्त कवी संमेलन उत्साहात पार पडले. हे कवी संमेलन या सर्वांसाठी लक्षवेधक ठरले होते. गाव खेड्यातून, वाड्यावस्त्यातून, रानावणातून आलेले कष्टकरी कवी या कवी संमेलनात उपस्थिती झाले होते. व्यवस्थेविरुद्ध एल्गार मांडणाऱ्या आणि कष्टकऱ्यांच्या जगण्याची वेदना मांडणाऱ्या कवितांनी सर्वच थक्क झाले होते. वॉचमन, शेतकरी, ड्रायव्हर, मजूर, कामगार यांच्या परिवर्तनवादी कवितांनी या देशातील कष्टकरी लोकांचे प्रश्न सर्वांसमोर उभे केले आणि वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्लीच्या संमेलनाच्या पूर्वसंध्येला धावत्या रेल्वेमध्ये झालेल्या या कवी संमेलनाने व्यवस्थेला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या परिवर्तनवादी संमेलनात विक्रम मालन आप्पासो शिंदे, अमोल कुंभार, लक्ष्मण जाधव, रमेश रेडेकर, गणेश दिवेकर, अशोक वानखेडे, भास्कर भोसले, कवी सोनवणे, डॉ. शरद गोरे यांनी कवितांच्या माध्यमातून नानाविध विषयांना वाचा फोडली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि साहित्ययात्री संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. शरद गोरे हे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. या कविसंमेलनाचे प्रास्ताविक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले. आभार लक्ष्मण जाधव यांनी केले.