स्वराज्य ते साम्राज्य: मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा-एक सांगीतिक मानवंदना,
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी १७ व्या शतकात रायरेश्वर येथे शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यानंतर, राजगड, रायगड, जिंजी, सातारा आणि पुणे ह्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानी म्हणून ओळखल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या उत्तराधीकार्यांनी स्वराज्याचा पुढे अटक ते कटक, तंजावर ते पेशावर असा मराठा साम्राज्यात विस्तार केला. मावळातील रायरेश्वर-राजगड ते खैबर खिंडीतील जमरुद किल्यांपर्यंतचा मराठ्यांचा पराक्रमाचा हा इतिहास सर्वांना प्रेरणादायी आहे. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तटावरील अटक किल्ला जिंकला. जनमानसात अटकेपार झेंडा रोवणे म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सर्वोच्च बिंदू मानली जाते. म्हणून या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या अतुलनीय पराक्रमाला वंदन करण्यासाठी, हा असाधारण विजय दिवस ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्रज्य दिवस’ म्हणून ओळखला जावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिका; बायोस्फिअर्स संस्था, पुणे; दख्खन इतिहास संशोधन संस्था, पुणे, अटकवीर मानाजी पायगुडे सभा, पुणे; शासनाचा डाक विभाग; विविध सेवाभावी संस्था आणि व्यापक स्वरूपात शिव-शंभू प्रेमींच्या सहभागातून आणि हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या शूर-योध्यांच्या वारसदार प्रतिनिधी यांच्या विशेष उपस्थितीत साजरा करण्याचा मानस आहे. शिवाय हा दिवस अधोरेखित करण्यासाठी आणि हि प्रेरणादायी ऐतिहासिक घटना सर्वदूर होण्यासाठी टपाल विभागाच्या माध्यमातून या विषया-संदर्भात डॉ. सचिन पुणेकर संकल्पित व प्रस्ताविक विशेष टपाल आवरण देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करणार आहोत. याच सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्वराज्य ते साम्राज्य: मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा-एक सांगीतिक मानवंदना संगीतकार आणि गायक श्री. उदय रामदास आणि सहकारी यांच्या माध्यमातून देणार आहोत. शिवशस्त्रगाथा या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन संग्राहक श्री. संतोष चंदने यांच्या माध्यमातून मांडणार आहोत. शंखनाद सेवा विश्व विक्रमी केशव शंखनाद पथक, पुणे देणार आहेत. याशिवाय लघुपट, पारंपरिक वाद्यवंदना अशा विविध भरगच्च कार्यक्रमाची पर्वणी असणार आहे.
आपल्याला ज्ञात आहेच कि पुणे हि त्याकाळातील या दैदिप्यमान घटनेच्यावेळी हिंदवी स्वराज्याची राजधानी होती आणि मराठा साम्राज्याचा-हिंदवी स्वराज्याचा सर्व कार्यालयीन कारभार हा शनिवारवाडा, पुणे इथून चालत होता . एकंदरीत हे स्थान-माहात्म्य लक्षात घेता वर नमूद सोहळा आपण शनिवारवाड्याच्या समोरील मोकळ्या प्रांगणात होणे औचित्याचे आहे. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिव-शंभूप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६:३० ते ९.०० वा . उपस्थित राहणार आहेत.



