एक_प्रवास_असाही……

462

गिरीश भोपी, पनवेल

पहाटे उठल्यापासून सोशल मीडियावर ट्राफिक अपडेट शोधणाऱ्या माझ्यासारख्या चाकरमान्यांचा काही महिन्यांपूर्वीचा प्रवास अतिशय सुरळीत चालला होता.

पाऊस तर सर्वांनाच हवा, पण जुलै महिन्यात अचानक आणि अनपेक्षित जोर धरलेल्या पावसाने रस्त्यांची करून ठेवलेली दुरावस्था, वाहतूक सुविधा आणि आमची दिनचर्या विस्कळीत करण्यात यशस्वी ठरली. तेव्हापासूनच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात मुंबई आणि नवी मुंबई च्या दिशेने प्रवास करणारा नोकरदार वर्ग सकाळी जाग आल्यापासून कोणत्या विभागात जास्त ट्राफिक आहे याचा शोध घेऊ लागला. तसेच त्या दिवशी आपल्या प्रवासाचा मार्ग कसा असावा हे निश्चित करू लागला. सांगायचं झालं तर प्रवास त्याच रस्त्यांवरून करायचा पण तो ट्रॅक्स, इको, एस.टी, बाईक, एन.एम.एम. टी. कि खाजगी वाहनाने ने करावा हा निर्णय आपल्या मित्रमंडळींसोबत चर्चा करून घेऊ लागला.

सामान्यतः उरण चारफाटा येथून सुरु होणारा प्रवास आपलं रोजचं नियोजित वाहन नसल्यास NMMT च्या स्थानकावर नजर मारून आणि ST डेपोत चौकशी करण्यापासून केला जातो. दोन्ही ठिकाणांकडून तोंडावर मारल्यासाखी निराशा मिळालीच कि, आपला संभ्रमावस्थेतला जीव घड्याळाच्या काट्यांकडे बघत मूळ स्थानकांपासून काहीशे मिटर पुढे म्हणजेच ONGC वसाहतीच्या आसपास जे येईल ते वाहन पकडण्यासाठी उभा केला जातो. सोबत Bus Tracker, Traffic Updates आणि मित्र, मैत्रिणींना कॉल करण्यात मोबाईल सोबत स्वतःची ऊर्जा संपवली जाते. याच अवस्थेत असल्यावर पाऊस पण कधी कधी एखादा सख्खा मित्र वेळीच साथ न द्यावा यापेक्षा फेविकॉलच्या मजबूत जोड सारखी साथ देतो.

रस्त्यावर उभ्या आमच्या प्रतिमा रस्त्याला डोळे लावून ३० किंवा ३१ नंबर बसची वाट बघत असतात. समोर काहीच नाही तरी देखील आपापल्या माना एकसारख्या वाकवून पाहणाऱ्या प्रवाशी वर्गाला आपल्या दिशेने येणारा लाल डब्बा दिसला कि करोडो रुपयांची लॉटरी लागावी आणि आनंदउत्सव साजरा करावा. अश्याच प्रकारे एकमेकांना सांगून अथवा स्मितहस्य देऊन “बस आली हा” याची हमी देतात. नेहमी साथ साथ वावरणारा हाच आमचा प्रवासी वर्ग एकदा का बस जवळ आली कि, “हम आपके है कोन” ची टॅग लाईन चेहऱ्यावर घेऊन बस मधे चढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडवतो. ड्राइवर चांगला असेल तर ठीक नाहीतर NMMT च्या मागच्या दारातून घुसणाऱ्या गर्दीमधे एखाद्याची अडकलेली बॅग, पायातून निसटलेली चप्पल, कोणाची टोपली तर कोणाची न बंद होणारी छत्री एखाद्याला त्रास तर देतेचं पण त्या प्रवाशाची बसण्याची जागा देखील घालवून बसते. तरीदेखील वरील अथक परिश्रम करून बसायला मिळवलेली जागा ‘कोणी ओळखीची महिला प्रवाशी भेटू नये रे देवा’ याचं एका आशेने टिकवण्याचा प्रयत्न देखील मनोभावे केला जातो.

काही वेळेपुरता घड्याळाच्या काट्यांचा विसर पडलेल्या प्रवासी वर्गाला आपापले मोबाईल फोन समोर धरल्यावर ऑफिसच्या पंचिंग टाइमची आठवण होते आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या आगोदर प्रवासाला निघालेल्या मित्रांना आणि बसच्या वाहकाला मोठ्या आपुलकीने विचारला जातो…. “पुढे ट्राफिक आहे का?” …. आणि नेहमीप्रमाणे उत्तर मिळतं ‘गव्हाण फाटा आणि करल ब्रिज जॅम आहे’! फुग्यामधली हवा काढावी तशीच आमच्यासारख्या प्रवास्यांची देखील काढली जाते. मग काय आपले Earphone कानात टाकले कि “राम भरोसे” प्रवासाला सुरुवात केली जाते.

दैनंदिन तर सोडाच उभ्या आयुष्याचा प्रवास हा सरळ नाहीच याची सर्वप्रथम जाणीव आम्हाला करलच्या पुलावर (Karal Bridge) पोहचल्यावर होते. Roller Coaster ची Ride फक्त तीस ते पस्तीस रुपयांमध्ये फक्त उरण मधील करलच्या रिकाम्या पुलावरच मिळू शकते. सोबत ट्राफिक असेल तर Extra Thrill ते देखील त्याच किंमतीत. पुढे तयार होत असलेल्या पुलाजवळ देखील थोड्या कमी प्रमाणात का होईन पण तशीच Ride अनुभवायला मिळते.

अतिवृष्टीच्या दिवसात पाण्यावर चालणारी बस पाहण्याचा तसेच त्याबसमधून प्रवास करण्याचा आनंद आम्हाला जासई गाव सोडल्यानंतर शंकर मंदिरजवळच्या रस्त्यावर घेता येतो. लहानपणी पनवेल बस स्थानकात ज्या संकटकालीन खिडकीचा वापर गर्दीच्या वेळी बस मधे चढण्याण्यासाठी केला जायचा आणि त्यानंतर फक्त संकटकालीन खिडकी, दरवाजा वाचून प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या इसमांना काही दिवसांपूर्वीच त्याचा वापर उतरण्यासाठी करावा लागला. पाचवीला पुजलेली आणि संयमाचा बांध फुटून रागाचा पूर यावा अशी गव्हानफाट्याची ट्राफिक विनाकारण म्हणजेच कोणातरी फक्त एका दोघांच्या चुकीमुळे लागलेली असते. अर्थातच वाहतूक पोलीस तिथे नियमित उभे राहिले तर तर ती परिथिती येणारच नाही. पण ते नियमित नससल्याने आपला प्रवास सुखकर झालाच तर कोणाला पाहवणार नाही का? असं देखील कधी कधी मनात येतं.

वहाळ, तरघर आणि रेतीबंदर येथील निरर्थक म्हणजेच चुकीच्या दिशेने टाकलेल्या वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून निघाल्यावर सुटकेचा श्वास सोडणारा नोकरदार ऑफिस मधे बॉसला आज उशिरा आल्याबद्दल काय कारण द्यावं? ते पटेल कि नाही? याकडे लक्ष केंद्रित केलं करतो. बॉस पण आजकाल काही बोलत नाही, Late Mark लावून सरळ पगार कापून घेतो. तो तरी काय करणार!

ऑफिस मधील तीन ते चार तासांच्या कामरूपी म्हणजेच ट्राफिक विरहित विश्रांतीनंतर Traffic In You Area नावाचे Google बाबाचे अपडेट्स आणि मित्रमंडळीचे मेसेजेस यायची सुरुवात होते आणि काही काळापुरता शांत झालेला जीव पुनः कासावीस व्हायला लागतो. परतीच्या प्रवासातील आगोदर निघालेल्या मित्र, मैत्रिणींना फोन करा, कसं जायचं? काही पर्याय आहे का? मग याला विचारा त्याला विचारा हे सर्व उपद्याप सुरु होतात. बऱ्याच वेळा निदर्शनात आलेलं आहे कि, नेमका पाच ते साडेपाच या वेळेदरम्यान आलेल्या “वहाळ, गव्हाणफाटा आणि जासई फुल जाम” या प्रकारच्या मेसेजचा आणि वस्तुस्थितीचा काहीही संबंध नसतो पण म्हणतात ना “झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये” या उक्तीला अनुसरून आमच्या सारखे बरेच प्रवासी निवांत चाललेल्या पक्ष्यांच्या थव्यावर कोणी निशाणा साधून गोळीबार करावा आणि सगळे पक्षी भरकटावे असेच इकडून तिकडून जसं मिळेल तसं प्रवास करत सुटतात. आणि घरी आल्यावर समजतं कि मूळ रस्ता तर मोकळाच होता. ज्यांना Traffic Jam आणि Moving Traffic यांमधला फरक कळत नाही त्या व्यक्तींकडून चुकून, मुद्द्दामहून ट्राफिक जॅम वाला मेसेज सोशल मीडियावर पसरवला जातो. आणि त्याचा अप्रक्षरीत्या परिणाम सामान्य प्रवासीवर्गावर होतो तो पुद्धीलप्रमाणे.

1) अश्याप्रकाराचा मेसेज आला कि नियमित प्रवासी वाहने प्रवास करण्याचे टाळतात. त्यामुळे रोजच्या प्रवाश्यांना पुरेशी वाहने उपलब्ध होत नाहीत
2) तीच वाहने कमी असल्याने जी आहेत त्यांचे प्रवासाचे दर अचानक वाढविले जातात. ते पण दुप्पट आणि तिप्पट.
3) झटपट प्रवासाच्या नादात वाहने चुकीच्या दिशेने टाकली जातात. आणि होत्याच नव्हतं करून ठेवतात.

रस्ते खराब आहेतच पण वरील सर्व कारणांमुळे आमचा एकावेळी फक्त 30 रुपये खर्चाचा, 45 मिनिटांमधे Non Stop होणारा प्रवास आज दुप्पट खर्च आणि तिप्पट वेळेवर जाऊन पोहचला. पुरुषांचं तर राहूद्या पण महिलावर्गाने देखील याच वाहतुकोंडीमुळे अनेक वेळा पायी प्रवास केला आहे. एखाद्या दिवसाचं ठीक आहे हो, पण ऑफिसमधे याचं कारणामुळे उशिरा पोचणाऱ्या सहकारी मित्रांना Memo/Warning Letter देखील मिळाले आहेत. तरीदेखील आमचा प्रवासीवर्ग शांत आहे. आज ना उद्या सर्व काही सुरळीत होईल याच एका आशेवर आपले दिवस अक्षरशः ढकलत आहे.

खरी परिस्थिती काय आहे हे शासन, प्रशासन, राज्यकर्ते, सा. कार्यकतें आणि लोकप्रतिनिधींना चांगलं ठाऊक आहे. तरीदेखील एवढ्या दिवसात कोणी काहीच बोललं नाही, आणि कोणाला बोलावंसं वाटलं नाही. सरते शेवटी तरुणाईने घेतलेला पुढाकार पाहून काहींना जाग आली. तरुणांचा पुढाकार नक्की क्रांती करेल अशी आशा आहे. कालच काही प्रवासीवर्गाकडून ऐकायला मिळालं. प्रवासी नावाचा ज्वालामुखी शांत आहे त्याला शांतच राहूद्या त्याचा उद्रेक झाला तर परिणाम चांगले होणार नाहीत. आणि हे खरं आहे !

सर्व जबाबदार व्यक्ती, शासन आणि प्रशासनाला एकच विनंती असेल थोडं लक्ष इकडे पण घाला. रोजगार नाहीत, कमी झालेत याबद्दल तुम्हाला कल्पना असेलच पण आहेत ते तरी टिकवण्याचा प्रयत्न करा.-

चेतन अनंत गावंड (पिरकोन, उरण)