पुणे प्रतिनिधी,
: हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील 1 जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगतानाच विजयस्तंभ येथील कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे तसेच सोशल मिडीयावर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे केले.
 विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दि. 1 जानेवारी रोजी नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यांना पुरविण्यात येणा-या सोईसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज प्रत्यक्ष स्मारकाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत ग्रामस्थांसमवेत नियोजना संदर्भात आढावा घेतला. यावेळी प्रशासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा याबाबतचे नियोजन उत्तम पध्दतीने करण्यात येत आहे. गतवर्षी विजयस्तंभ कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. यावर्षीदेखील त्याच धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांशी संवाद साधून नियोजन बैठका सुरू आहेत व आणखीही बैठका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतुक व्यवस्थेसंदर्भात वाहन थांबा देण्यासाठी पेरणे परिसरातील जागा ठरवून त्या जागा वाहन थांब्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यास मदत होईल. अहमदनगरवरून येणारी वाहतूक व्यवस्था वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 यावेळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सोशल मिडीयावरही पोलीस यंत्रणेमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी येणा-या नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. या संवाद बैठकीस सरपंच रूपेश ठोंबरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
00000