पुणे प्रतिनिधी,
: राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय एकविसावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आणि प्रा. प्रकाश पगारिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २१ आणि २२ डिसेंबर २०१९ या दोन दिवशी प्रीतम-प्रकाश महाविद्यालय, सेक्टर न. १, इंद्रायणीनगर, भोसरी येथे हे संमेलन होणार आहे. डॉ. अशोककुमार पगारिया संमेलनाचे अध्यक्षपद, तर समाजनिष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल स्वागताध्यक्षपद भूषवित आहेत. संमेलनात देण्यात येणारा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ यंदा शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांना, तर ‘बंधुता जीवनगौरव पुरस्कार’ हाजी अफझलभाई शेख, प्रकाश जवळकर आणि मधुश्री ओव्हाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली. यावेळी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सरचिटणीस शंकर आथरे, प्रकाश जवळकर, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे,प्रा. सदाशिव कांबळे, प्रशांत रोकडे उपस्थित होते.
प्रकाश रोकडे म्हणाले, “संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २१) सकाळी १० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नवीदिल्ली येथील ऑल इंडिया श्वेतांबर स्थानाक जैन कॉन्फरन्सचे अध्यक्ष पारस मोदी, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष बबनराव भेगडे, संघटक डॉ. विजय ताम्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी ‘बंधुताच्या विचारधारा’ पुस्तकाचे, ‘मूल्यवैभव’ संमेलन समरणिकेचे प्रकाशन होणार आहे.संमेलनाचा समारोप रविवारी (दि. २२) ४.३० वाजता होणार असून, यावेळी राष्ट्रीय बंधुता पुरस्कार आणि बंधुता जीवनगौरव पुरस्कार स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश रोकडे, बबनराव भेगडे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ‘गुणवंत शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी’ पुरस्कारही देण्यात येतील.”
दोन दिवसीय या संमेलनात दुसऱ्या सत्रात कवी चंद्रकांत वानखेडे यांचा ‘जाऊ कवितेच्या गावा’ हा कर्यक्रम होईल. भोसरीतील टागोर माध्यमिक विद्यालयाला ‘श्यामची आई पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तिसऱ्या सत्रात ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान’ या विषयावर लक्ष्मणराव ढोबळे यांचे व्याख्यान व अरिहंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बजरंग कोरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव यांना ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार’, तर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकुलसचिव उत्तम जाधव यांना ‘राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान केला जाईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमित गोरखे, विचारवंत प्रा. जे. पी देसाई, विलासकुमार पगारिया उपस्थित राहतील. चौथ्या सत्रात ‘साहित्यातील लोकरंग’ या खुमासदार कार्यक्रमात डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रकट मुलाखत कवी उद्धव कानडे घेतील. प्रसंगी विविध क्षेत्रातील यशवंताना ‘भूमिपुत्र पुरस्कार’ प्रदान केला जाईल.
दुसऱ्या दिवशी ‘काव्यपंढरी’ कवीसंमेलन, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार (संदीप कांबळे), लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार (विलास ठोसर), पदमश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराचे (शेख बिस्मिल्ला सोनोशी) वितरण होईल. सहाव्या सत्रात ‘स्त्री मुक्तीच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ या विषयांवर डॉ. अश्विनी धोंगडे यांचे व्याख्यान, तर नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, निवृत्त अधिकारी सुलभा निवंगुणे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सातव्या सत्रात ‘बंधुता आणि संघर्ष’ या विषयांवर बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची प्रकट होणार आहे, असे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी नमूद केले.
————————–
बंधुता’चा इतिहास ग्रंथरूपात
बंधुताचार्य प्रकाश रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंधुतेसाठी, समतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या बंधुता साहित्य परिषदेचा इतिहास आणि कार्य ग्रंथरूपात मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २१ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, बारा विचारवेध संमेलने, सहा विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलने आणि इतर समाजोपयोगी उपक्रम परिषदेच्या माध्यमातून गेल्या चार दशकांत राबवले जात आहेत. या चळवळीचे सर्व कार्य ग्रंथरूपात एप्रिलमध्ये येईल, असे प्रकाशक कवी चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले.
————————-