Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीज्येष्ठ महिलेच्या अडचणीची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतली तात्काळ दखल

ज्येष्ठ महिलेच्या अडचणीची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घेतली तात्काळ दखल

पुणे प्रतिनिधी,

कोरोना’च्या प्रतिबंधासाठी देशासह पुणे ‘लॉकडाऊन’…! नागरिकांनी घरी थांबण्याच्या शासन आणि प्रशासनाच्या सूचना…! पुण्यातील बाणेरमधील ‘अथश्री’ ही ज्येष्ठ नागरिक असणारी… थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठांची सोसायटी…! घरात काही सामान संपलं तर ऑनलाईन सेवेचा लाभ घेणारी ही मंडळी…! इथल्या नागरिकांच्या गरजा ‘अथश्री होम्स प्रा.लि.’चे कर्मचारी नेहमी पुरवतात, पण संचारबंदीमुळं त्यांनाही अडचण येवू लागली… बरं.. संचारबंदीमुळं ऑनलाईन सेवेबरोबरच अन्य सुविधाही बंद… घराबाहेर पडायलाही बंदी… ! किराणा माल आणायला दुकानात जावं तर तेवढं ओझं तरी उचलता यायला हवं..! स्वत:च्या घरी थोडंफार सामान असलं तरी सोसायटीतल्या अनेकांचं काय? या अडचणी जाणून इथल्या सोसायटीतल्या एका ज्येष्ठ महिलेनं विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांना व्हॉट्स ॲप व ई-मेल वर इथल्या नागरिकांच्या अडचणींबद्दल सायंकाळी संदेश पाठवला..
पुणे विभागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त असणाऱ्या डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ज्येष्ठांच्या अडचणीचा हा संदेश पाहिला आणि क्षणार्धात सुत्रे हालवली… ! जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यापर्यंत ही अडचण पोहोचली.. जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांना सोसायटीतील या महिलेशी संपर्क करुन येथील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पुरवठा निरीक्षक प्रितम गायकवाड यांनी सोसायटीमध्ये जावून या महिलेशी संवाद साधून ज्येष्ठांच्या अडचणी जाणून घेवून वरिष्ठांना लगेचच माहिती दिली. यानंतर अल्पावधीतच येथील नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या. कारण होतं… या भागातील दुकानदारांना या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच वितरीत करण्याच्या सूचना पोहोचल्या होत्या… वरिष्ठ पदावर कार्यरत असूनही एका संदेशावर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ घेतलेली दखल व प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे येथील ज्येष्ठांना लॉकडाऊन काळातही आलेला हा सुखद अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा होता..
प्रशासनाच्या लोकसेवेबद्दल या ज्येष्ठ महिलेने म्हटले आहे की, “डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: लक्ष घालून प्रशासनाच्या वतीने घेतलेल्या ‘क्वीक ॲक्शन’ बद्दल मनापासून धन्यवाद..! जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवून आमच्याशी नम्रपणे साधलेला संवाद आणि ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीतही ई-मेल संदेश पाठवल्यापासून बारा तासांच्या आत उपलब्ध करुन दिलेली तात्काळ सेवा निश्चितच प्रशंसनीय आहे. यामुळे शासन सेवेबद्दलचा आमचा विश्वास अधिकच वाढला आहे..!”

वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!