Friday, March 21, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडकोटा येथे अडकलेले 27 विद्यार्थी व 7 पालक रायगड मध्ये दाखल

कोटा येथे अडकलेले 27 विद्यार्थी व 7 पालक रायगड मध्ये दाखल

पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रयत्नांना यश

गिरीष भोपी, रायगड

राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थीही गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या प्रयत्नांना यश येऊन आज एकूण 27 विद्यार्थी आणि 7 पालक राजस्थान, कोटा येथून आपल्या जिल्ह्यात सुखरुप परत आले.

पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. त्याचप्रमाणे राजस्थान सरकारसोबत सुद्धा त्यांनी संपर्क साधला होता. त्यानुसार राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात आपल्या मूळ गावी रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिली होती.

यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली होती आणि त्यानुसार अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुढील समन्वयाची आवश्यक ती तयारी केली.

काल दि.28 रोजी पहाटे कोटा येथून या 27 विद्यार्थ्यांना व त्यांच्या 7 पालकांना घेवून निघालेली बस आज (दि.29) सकाळी 6 वा. बस खारघर येथे पोहोचली. प्रवासात या सर्वांकरिता उज्जैन व धुळे येथे फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासादरम्यान कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या पालकांचे आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. पालकांना धीर दिला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन कालावधी सुरू असून खबरदारी म्हणून या सर्वांची खारघर येथे पोहोचल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सर्वांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारण्यात आला असून प्रत्येकास 14 दिवसांपर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

या सर्वांनी महाराष्ट्र शासनाचे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे आभार मानताना आम्ही शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे कायम ऋणी राहू, परराज्यातून आम्हाला आमच्या घरी सुखरुप आणल्याबद्दल आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!