पुणे प्रतिनिधी,
नवचेतना ग्रुपचे समाजाभिमुख कार्य भुषणावह असून त्यामुळे संस्कारक्षम पिढी निर्माण होईल असे मत राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ता.का.सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रभाषा भवनामध्ये नवचेतना ग्रुपने आयोजित केलेल्या लॉकडाउन काळातील उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी ते बोलत होते. ज्या घरात संस्कारक्षम व सुशिक्षित स्त्री निर्माण होते ते घर स्वर्गा सारखेच असते असे त्यांनी स्पष्ट केले. महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सौ मंगल मोरे यांनी महिलांनी प्रगती करताना पुरुषांच्या सहकार्याची जाणीव ठेवून कार्यरत राहावे असे सांगितले. स्त्रीची भूमिका वैविध्यपूर्ण असल्याने तिने कटाक्षाने कार्य करावे असेही त्यांनी सांगितले. प्रमुख वक्त्या सौ.उर्मिला आपटे यांनी सामान्य स्त्रीचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच स्त्रीने स्वत मधील अंगभूत गुणांचा विकास करून प्रगतीपथ गाठावा.स्त्री ही वसुंधरेचा अंश असल्याने तिने सोशिकता बाळगावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आकांक्षा बोंगाळे यांनी केले व प्रास्ताविक प्राचार्या सौ. विभा साबळे यांनी केले. सौ संगीता काळे यांनी आभार मानले.
सौ संगीता काळे यांनी नवचेतना ग्रुप च्या उपक्रमाची तपशीलवार माहिती देऊन समाजाभिमुख कार्यांचा मानस भविष्यातही राबवण्याचा विचार व्यक्त केला. सकाळच्या सत्रात जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस दलातील सर्व महिला अधिकाऱ्यांचा सत्कार या ग्रुपमार्फत करण्यात आला.
नवचेतना ग्रुप ची निर्मिती संगीता काळे , विभा साबळे, आकांशा बोंगाळे यांनी केली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवचेतना ग्रुप चे सदस्यांनी परिश्रम घेतले.
नवचेतना ग्रुप अंतर्तगत अंधश्रद्धा निर्मूलन, स्वछता मोहीम, वाचन प्रकल्प, पशु पक्षी निरीक्षण इत्यादी नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवले जातात.