जुगाड्या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

939

महाराष्ट्रात एकाच वेळी होणार प्रदर्शित

अलिबाग प्रतिनीधी,

जीवन जगताना आपल्या बुद्धीच्या आणि चातुर्याच्या जोरावर आपले ध्येय गाठताना संकटांना सामोरे जाणाऱ्या तरुणाची रंजक कथा असणारा जुगाड्या मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे . महाराष्ट्रातील बहुतांश चित्रपट गृहात 14 एप्रिल 2023 रोजी एकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे . जुगाड्या चित्रपटात कथा , संवाद लेखन , कलाकार आणि निर्माता अशा महत्वाच्या भूमिका बजावणारे संदेश (आप्पा) पालकर यांनी चित्रपट प्रदर्शनाची माहिती दिली .

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नावाजलेले निर्माता आणि दिग्दर्शक वेगवेगळ्या कथा घेऊन चित्रपट प्रदर्शित करीत असतात . परंतु रायगड जिल्ह्यातील अलिबाग रामराज येथील सिने अभिनेते संदेश (आप्पा) पालकर यांनी सर्वसामान्यांचे वास्तव मांडणारी कथा प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. जुगाड्या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्टीत जुगाड शोधणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाच्या बुद्धिमत्तेचा फायदा घेत, ही व्यवस्था स्वतःच्या महत्वकांक्षेसाठी त्या तरुणाचा कसा उपयोग करुन घेते , याची रंजक कथा ‘जुगाड्या” चित्रपटात पहावयास मिळणार आहे .

अचानक उद्भवलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगावर नाविन्यपूर्ण तोडगा काढणारा चित्रपटाचा हिरो आपल्या मित्रांचा व गावातील लोकांचा खास आहे . तरुणाच्या याच गुणाला भाळून एक तरुणी त्या तरुणाच्या प्रेमात पडते. याच दरम्यान तरुणाला महानगराच्या मायानगरीत एक चांगली नोकरी मिळते, माया नगरीतील अफाट माया बघून तो तरुण वाहत जातो, सत्ता आणि संपत्तीच्या खेळात तो तरुण एक मोहरा बनून जातो आणि तो एका अशा टप्प्यावर पोहचतो जिथून परतीची वाट नसते, जणू तो एका सिंहाच्या गुहेत फसतो, कटकारस्थानाचा हा जबडा तो तरुण फाडतो की, त्याचा घास बनतो? याचा उलगडा करणारी चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक कथा आपल्याला ‘जुगाड्या’त पहायला मिळणार आहे . या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण अलिबाग तालुक्यात करण्यात आली असून विशेष करून नांगरवाडी गावात आणि मुंबईत करण्यात आले आहे .

चित्रपटाचे दिग्दर्शन नरेंद्र ठाकूर यांनी केले तर पटकथा सुनील धुमाळ व नरेंद्र ठाकूर यांनी लिहिली असून चित्रपटाला विक्रांत वार्डे यांनी सुमधुर संगीत दिले आहे . चित्रपटामध्ये दीपक अंगेवार आणि महेश नायकुडे यांनी गीते लिहिली आहेत. रोहित राऊत, वैशाली सामंत, मीरा कारलेकर, अक्षय ठाकूर, हर्षल पाटील, विक्रांत वार्डे, भूमी काळबेरे, आर्यन पडवळ आदी गायकांनी पार्श्वगायन केले आहे . तर संकलन सुबोध नारकर यांनी केले असून छायाचित्रण स्वप्नील मनवल यांनी केले आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कलाकार राजू खेर यांनी प्रथमच मराठी मध्ये खलनायकाची भूमिका केली असून चैतन्य सरदेशपांडे, जुईली टेमकर, जयराज नायर, सुदेश म्हसिलकर, प्रणव रावराणे, मयूर पवार, प्रदीप वाळके, राजेंद्र जाधव, वैशाली जाधव, सुषमा चव्हाण, मुकेश पाटील हे प्रमुख भूमिकेत असून अलिबाग तालुक्यातील अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.