माळवाडी पाणीपुरवठासाठी लष्कर केंद्रावर मोर्चा – रास्ता रोको आंदोलनचा इशारा
पुणे (प्रतिनिधी)
संसदपटू पुरस्कार घेऊन मिरविणारे आमदार आपल्या मतदारसंघात पिण्याचे पाणी पुरविण्यास अपयशी ठरले आहेत, माळवाडी व हडपसर परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत केली नाही तर पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे वाभाडे काढले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.
माळवाडी येथील राजश्री शाहू गृहरचना सोसायटी मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लष्कर पाणीपुरवठा केंद्रात हंडामोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी वंदना मोडक, राजेश आरणे, शैलेंद्र बेल्हेकर, शादाब खान, सोसायटीचे चेअरमन दिनेश हाक्के, अशोक गव्हाणे, नाना हजारी मुळेकर, पूनम मांढरे, नंदा चव्हाण, नलिनी फडके आदिसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लष्कर पाणीपुरवठा उपअभियंता विलास मोराळे यांच्याशी प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलकांनी चर्चा केली. दोन दिवसात सोसायटीत अधिकारी भेट देतील व पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन मोराळे यांनी दिले.