– पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा
– मला बदनाम करण्याचा कट
पुणे : आमच्या भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु त्याने अनधिकृतपणे आमच्या जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबियांवर बिल्डरने दडपशाही केली. माझा अपंग भाऊ ऍड. अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली. तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण काढले असताना आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट असल्याचा आरोप प्रसिद्ध कीर्तनकार, चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधीत बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतूने असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
वस्तुस्थिती बाबत अधिक माहिती देताना चैतन्य वाडेकर म्हणाले की त्यांचे भांबोली येथे सर्व्हे नंबर ५६ आणि गट नंबर २४५ मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या क्षेत्रापैकी २ हेक्टर क्षेत्र विक्री करताना माझे कुटुंबाने केवळ २२० फूट फ्रंट असलेले उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र विक्री केले होते परंतु सदर बांधकाम व्यावसायिकाने त्यापेक्षा अधिक जागेवर बेकायदेशीरपणे ताबा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सव्र्व्हे नंबर ५६ पैकी ७९ आर क्षेत्राची खरेदी आमच्या आजोबांच्या नावे असून त्याची मालकी व ताबा आमच्या कुटुंबाकडे होता आणि आहे. परंतु सदर क्षेत्राची नोंद भूमि अभिलेखात आमचे नावे न झाल्यामुळे आमच्या कुटुंबाने मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांचेकडे २००७ साली सदर रेकॉर्ड दुरुस्तीसाठी अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी आमचे अपील मान्य करून मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांनी सदर प्रकरणी दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत.
तसेच या क्षेत्रावर बिल्डरने विकसन परवानगी मिळवताना करण्यात आलेल्या मोजण्या करताना आम्हाला सहधारक असून देखील कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी सूचना दिली नाही. संबंधित यंत्रणे कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परस्पर चुकीच्या मोजण्या करून आमच्या जागेवर अतिक्रमण केले. परिणामी संबंधित व्यवसायिकांनी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल वाडेकर हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचा गैरफायदा घेत आमच्या मालकीच्या आणि ताबेवहिवाटीच्या जागेत दांडगाईने अतिक्रमण करत बांधकाम चालू केले असून त्याविषयी आम्ही वेळोवेळी पोलिसांकडे लेखी तक्रारी करून देखील आम्हाला दाद दिली गेली नाही. त्यानंतर आम्ही मा. महानगर आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे (पीएमआरडीए) यांचेकडे सदर बांधकाम चालू झाल्यानंतर त्वरित लेखी तक्रार दाखल केली होती, असे म्हटले आहे.
या तक्रारीवर पीएमआरडीए कडून त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खेड यांचे कडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मोजण्या आधारे विकास परवानगी दिली असल्याने त्या मोजण्या सक्षम प्राधिकरणाकडून रद्द करून आणण्यास सांगितले होते. त्यानंतर आम्ही पीएमआरडीए कडे आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित जमिनी विषयी प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे विकास परवानगी कामी इतर कोणत्याही परवानग्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी अर्ज देऊन ठेवला होता. तरी देखील पीएमआरडीए कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत संबंधित व्यवसायिकांना आणि बांधकाम धारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
ही बांधकाम परवानगी ज्या बेकायदेशीर मोजण्यां आधारे देण्यात आली, त्या सर्व मोजण्या रद्द करण्यासाठी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल सयाजी वाडेकर यांनीभूमि अभिलेख यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी त्यांचे अपील मान्य होऊन सदर सर्व मोजण्या आणि बिनशेती मोजणी तसेच त्या आधारे तयार करण्यात आलेले क. जा. प. देखील रद्द करण्यात आले असून संबंधित सर्व गटांचे सातबारा पुनर्जीवित करण्यात आलेले आहेत.
त्या मोजण्या रद्द झाल्याने बिल्डरने घेतलेली विकास परवानगी रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आणि ती विकास परवानगी रद्द करण्यात आली होती तसेच सदर बेकायदेशीर व अवैध बांधकाम पाडण्याचे देखील आदेश देण्यात आलेले होते. या संपूर्ण प्रक्रियेला आम्हाला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला आणि सदर बांधकाम परवानगी रद्द झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक पीएमआरडीएला भेट देतात व त्यांच्या केवळ एका साध्या अर्जावरून आम्हाला कोणतीही सूचना व नोटीस न देता फक्त अर्ध्या तासात सदर विकास परवानगी रद्द झाल्याचे पत्र रद्द करण्यात आले त्यांनी सांगितले.
भूमि अभिलेख यांनी दिलेल्या मोजण्या रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात बांधकाम व्यावसायिकांनी उपसंचालकभूमी अभिलेख यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यांच्या या मागण्या फेटाळल्या. त्यानंतर परत पीएमआरडीए कडे लेखी तक्रार करत संबंधित विकास परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज केला असताना नेहमीप्रमाणे यावेळी देखील पीएमआरडीए कडून टाळाटाळ केली.
यानंतर भूमि अभिलेख विभागाने दिलेल्या निर्णयाने व्यथित होऊन बांधकाम व्यावसायिकांनी मुंबईतील महसूल मंत्रालयात फेरतपासणी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही फेरतपासणी अर्ज नामंजूर केला. त्यानंतरही पीएमआरडीए कडून दखल घेतली गेली नाही.
त्यानंतर सदर बांधकाम व्यवसायिकांकडून माझे अपंग असलेले मोठे भाऊ यांना वारंवार धमकावण्याचा तसेच सदर कार्यवाही थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असे म्हणत त्यांच्या शारीरिक व्यंगांवर वक्तव्य करत आम्हाला आता पीएमआरडीएने वेळ दिला असल्याने तुम्ही मिळवलेल्या सर्व आदेशांवर आमच्याकडे असलेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवून हे प्रकरण वर्षानुवर्षे असेच प्रलंबित ठेवणार आहोत, असे सांगण्यात या सर्व प्रकरणामुळे आमच्या मोठ्या भावाला शारीरिक तसेच मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमच्याकडे जागेच्या मालकीचे पुरावे असून देखील आम्हाला आमच्या जागेत जाण्यासाठी या व्यवसायिकांनी मज्जाव केला असल्याने माझे भाऊ प्रमोद वाडेकर यांनी आमची असलेली मोकळी जागा, ज्या जागेचा वापर अनाधिकृतपणे सदर बांधकाम व्यवसायिक जाण्या-येण्यासाठी वापर करत आहेत त्या जागेचा कोणालाही वापर करून न देण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझा भाऊ आमच्या जागेचे नियोजन करत होता, तिथे कोणताही गुंड उपस्थित नव्हता आणि मी माझ्या घरातच बसून होतो. सदर प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी आले आणि मला फोन केला की आम्ही तुमच्या घरापाशी आलेलो आहे, आम्हाला पण तुमच्यासोबत फोटो घेऊद्या, तुम्ही भेटायला या. मी तिथे गेलो आणि त्यांनी माझे त्याठिकाणी फोटो काढले. दुसऱ्या दिवशी सदर बांधकाम व्यवसायिकांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन माझा मोठा भाऊ प्रमोद यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणचा ताबा पोलिसांच्या उपस्थितीत आमचेकडून काढून घेऊन सदर बांधकाम व्यवसायिकांना देत असताना आमचा अपंग भाऊ अॅड. अमोल वाडेकर यांनी त्यांना थांबवल्यानंतर पोलिसांनी त्यांना देखील पोलीस स्टेशनला येण्याची विनंती केली. माझ्या भावासोबत मदतीला मी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलिसांकडून आमचे तिघांवर आमचेच वडिलोपार्जित मालकी व ताबेवहिवाटीच्या जागेतून बांधकाम व्यावसायिकाचा रस्ता अडवलेचे कारणावरून गुन्हा दाखल केला आणि आम्हाला जामिनावर सोडण्यात आले. सदर प्रकरणी जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. हा बांधकाम व्यावसायिक खेड तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील एक कुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून सर्वानाच त्याच्या चुकीच्या कामांची प्रचिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
—-