Monday, November 17, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीग्लोबललॉजिक तर्फे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल येथे अद्ययावत स्टेम लॅबची सुरुवात

ग्लोबललॉजिक तर्फे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल येथे अद्ययावत स्टेम लॅबची सुरुवात

 अनिल चौधरी पुणे,:

डिजिटल प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये आघाडीवर असलेली हिताची ग्रुप कंपनी ग्लोबललॉजिक (GlobalLogic) ने इंडिया एसटीईएम फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये “रोबो शिक्षा केंद्र” या नावाने आपले पहिले एसटीईएम (STEM) इनोव्हेशन लॅब सुरू केले. हा उपक्रम कंपनीच्या ‘Educate to Empower’ या CSR कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आला असून, इयत्ता ६वी ते ९वीतील ७६३ विद्यार्थिनींना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे.

या अत्याधुनिक लॅबमधून विद्यार्थिनींना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंगसारख्या विषयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळणार आहे. यासोबतच शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे STEM शिक्षण नियमित वर्गांमध्ये समाविष्ट करून दीर्घकाळ टिकणारा परिणाम साधता येईल. या प्रयोगशाळेमुळे वंचित विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.

या उद्घाटन समारंभाला ग्लोबललॉजिकच्या नेतृत्वासोबतच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. यात श्रीमती कमलादेवी आवटे (उपसंचालक – SCERT, महाराष्ट्र) आणि श्री. सुधांशु शर्मा (संस्थापक व संचालक – इंडिया STEM फाउंडेशन) यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने भारतातील तरुणांना लहान वयातच डिजिटल साधने आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले.

ग्लोबललॉजिकच्या CSR प्रमुख मोनिका वालिया म्हणाल्या, “आर्थिक अडचणींमुळे जवळपास ५९% मुली STEM शिक्षण अर्धवट सोडतात. समान संधी मिळणे ही केवळ सामाजिक गरज नाही, तर ‘विकसित भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी अत्यावश्यक आहे. ग्लोबललॉजिकमध्ये आम्ही तंत्रज्ञानाला एक शक्तिशाली समानता साधक मानतो. रोबोटिक्स व एआयचे प्रत्यक्ष शिक्षण वंचित शाळांमध्ये उपलब्ध करून देऊन आम्ही संधींमधील तफावत कमी करत आहोत आणि भारताच्या डिजिटल भविष्यासाठी सक्षम पिढी घडवत आहोत.”

ग्लोबललॉजिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष – अभियांत्रिकी विक्रम पुराणिक यांनी सांगितले, “पुणे हे आयटी आणि शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे एआय, रोबोटिक्स, कोडिंगसारख्या विषयांचे शिक्षण वंचित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे म्हणजे उद्याची नाविन्यपूर्ण पिढी घडविण्याकडे टाकलेले ठोस पाऊल आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना दृश्यात्मक, आकर्षक आणि प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांची उत्सुकता जागृत करेल व गळतीचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल.”

इंडिया STEM फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक सुधांशु शर्मा यांनी सांगितले, “ग्लोबललॉजिकसोबतची आमची भागीदारी संपूर्ण भारतात STEM शिक्षण पुढे नेण्यात महत्त्वाची ठरत आहे. CSR उपक्रमाद्वारे भविष्यासाठी तयार होणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याची त्यांची बांधिलकी आमच्या समान दृष्टीचे प्रतिक आहे. यामुळे अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल आणि तरुण मनांना तंत्रज्ञान तसेच सामाजिक प्रगतीसाठी प्रेरित करता येईल.”

या लॅबचा परिणाम विद्यार्थ्यांच्या कामगिरीतून आधीच दिसून येतो आहे. “Future Femmes” या टीममधील तीन विद्यार्थिनींनी वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाडच्या राष्ट्रीय फेरीत स्थान मिळवले. त्यांचा “अमृतदर्पण” हा AI आणि IoT आधारित प्रकल्प पाण्याच्या गुणवत्तेच्या समस्यांवर उपाय सुचवतो. देशभरातील २९३ टीम्समधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

ग्लोबललॉजिकच्या STEM Innovation Lab उपक्रमाचा विस्तार २०२२ मध्ये नोएडामधून सुरू झाला. तेथे ५८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. २०२३ मध्ये हा उपक्रम बंगळूरमध्ये पोहोचला आणि २०२४ पर्यंत देशभर आणखी चार लॅब सुरू झाल्या. सध्या देशभरातील सहा लॅबमधून ४,७०० हून अधिक विद्यार्थ्यांना STEM शिक्षणाची संधी मिळत आहे.

ग्लोबललॉजिकचा प्रमुख CSR उपक्रम ‘Educate to Empower’ हा वंचित विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्येच नाहीत, तर सामाजिक जबाबदारीची जाण व भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळते. या माध्यमातून ग्लोबललॉजिक सामाजिक बदलात सक्रिय सहभाग नोंदवत असून, भारताच्या पुढील पिढीला सक्षम बनविण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करत आहे.

ग्लोबललॉजिक (GlobalLogic) www.globallogic.com ही हिताची ग्रुप अंतर्गत कार्यरत डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी आहे. जगभरातील ब्रँड्सना आधुनिक युगासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल अनुभव तयार करण्यात कंपनी आघाडीवर आहे. ऑटोमोटिव्ह, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, मीडिया, सेमीकंडक्टरसह विविध उद्योगक्षेत्रांमध्ये कंपनीची तांत्रिक कौशल्ये वापरली जातात. सिलिकॉन व्हॅलीमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबललॉजिक जगभरात डिझाइन स्टुडिओ आणि अभियांत्रिकी केंद्रे चालवते. हिताची ग्रुपचा भाग म्हणून कंपनी डेटा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत समाजासाठी नवकल्पना घडविण्यात योगदान देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!