अनिल चौधरी , पुणे
इशान्या फाउंडेशन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यलो रिबन स्वयंसेवी संस्थेचा ग्रामीण भारत महोत्सवाचा १८ वा मेळाव्याचे उद्घाटन आज क्रिएटिसिटी, येरवडा, पुणे येथे झरीना स्क्रूवाला (सहसंस्थापक – स्वदेश फाउंडेशन), पारुल मेहता (विश्वस्त – इशान्या फाउंडेशन) आणि रश्मी दराड (मुख्य महाव्यवस्थापक – नाबार्ड) यांच्या हस्ते झाले.हा पाच दिवसीय मेळा १८ ते २२ सप्टेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी मोफत खुला राहणार आहे.
यंदाचा विषय भारतातील कारागीर, शेतकरी, विणकर, स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्योग यांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करतो. २० हून अधिक राज्यांमधील ३,००० पेक्षा जास्त वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एका छताखाली आणून हा मेळा केवळ बाजारपेठ राहिलेला नाही, तर तो समुदायांना व ग्राहकांना जोडणारा एक मंच ठरतो आहे. हा उपक्रम सन्मानाने उपजीविका साजरी करतो तसेच सर्जनशीलता, कारागिरी आणि समुदाय प्रेरित नवनिर्मितीचे प्रदर्शन करतो, जे शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्य घडविण्यात योगदान देतात.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमती झरीना स्क्रूवाला म्हणाल्या,
“यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा हे बाजारपेठेचे सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रभावी उदाहरण आहे. प्रत्येक स्टॉल ही जिद्द, सक्षमीकरण व शाश्वततेची कथा आहे. या मेळ्याची खरी खासियत म्हणजे प्रत्येक खरेदीचा होणारा सकारात्मक परिणाम – शेतकऱ्यांना मदत, महिलांना सबलीकरण, कारागीरांचे अस्तित्व टिकवणे आणि संपूर्ण समुदायांना उन्नती देणे. पुण्यासारख्या शहरात असा उपक्रम होताना पाहणे प्रेरणादायी आहे, कारण तो शहरी ग्राहकांना ग्रामीण परिवर्तनकर्त्यांशी जोडतो आणि आपल्याला अधिक समावेशक व करुणामय भविष्य एकत्र घडविण्याची जाणीव करून देतो.” असेही यावेळी त्या म्हणाल्या.
प्रवासाचे स्मरण करताना श्रीमती पारुल मेहता म्हणाल्या,
“इशान्या फाउंडेशनमध्ये आम्ही नेहमीच समुदायांना सक्षम करणाऱ्या व परंपरा जपणाऱ्या संधी निर्माण करण्यावर विश्वास ठेवला आहे. गेल्या १७ वर्षांत यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा एका छोट्या उपक्रमातून पुण्यातील सर्वात प्रतिक्षित सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक बनला आहे. हा १८ वा सोहळा आमच्या ध्येयाचा पुनरुच्चार करतो – उपजीविका निर्मिती आणि सामाजिक कल्याण यांचा सुंदर संगम घडविणे. दरवर्षी हा मेळा आकार, विविधता व परिणामात वाढत चालला आहे. या उपक्रमात सातत्याने साथ देणाऱ्या नाबार्ड, आमच्या भागीदार स्वयंसेवी संस्था, स्वयंसहायता गट, कारागीर व शेतकरी यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”
श्रीमती रश्मी दराड – मुख्य महाव्यवस्थापक, नाबार्ड यांनी सांगितले की,
“नाबार्डने नेहमीच ग्रामीण समुदायांचे सबलीकरण आणि शाश्वत उपजीविका प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्धता ठेवली आहे. यलो रिबन स्वयंसेवी संस्था आणि कारागीर मेळा हा तळागाळातील कारागीर, स्वयं-साहाय्य गट आणि स्वयंसेवी संस्थांना त्यांची कला, सर्जनशीलता आणि उद्यमशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देतो. ग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी भरून काढणाऱ्या या उपक्रमाला आम्ही पाठिंबा देत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. हा उपक्रम सर्वसमावेशक विकास आणि आत्मनिर्भरता घडवून आणण्यास मदत करतो.”
खरेदीच्या पलीकडे, हा मेळा कुटुंबासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल असा विचार करण्यात आला आहे. पर्यटकांना खास महाराष्ट्रीयन पदार्थ – पुरणपोळी, थालीपीठ, पिठलं भाकरी – यांचा आस्वाद घेता येईल. सांस्कृतिक कार्यक्रम व कार्यशाळा वातावरण अधिक उत्सवी करतील. प्रत्येक तासाला लकी ड्रॉ, कारागीर व शेतकऱ्यांशी संवाद, तसेच मुलांसाठी विशेष ट्रॅम्पोलिन पार्क व प्ले झोन यामुळे प्रत्येक वयोगटाला काहीतरी अर्थपूर्ण व आनंददायी अनुभव मिळेल.
प्रत्येक स्टॉल म्हणजे महिलांच्या उपजीविकेचा, ग्रामीण विकासाचा, सेंद्रिय शेतीचा, पारंपरिक विणकामाचा, युवकांना रोजगार देण्याचा, कौशल्य विकासाचा, पुनर्वापर उपक्रमांचा व दिव्यांग आणि शिकण्यातील अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी समावेशन कार्यक्रमांचा प्रवास आहे.येथील खरेदीमुळे पर्यटकांना अनोखी उत्पादने मिळतातच, पण ते सामाजिक बदलाच्या व्यापक चळवळीचा भागही होतात. व्यापार, संस्कृती व समुदायाचा अद्वितीय संगम साधणारा हा मेळा पुण्यातील सर्वात महत्त्वपूर्ण व उद्देश्यपूर्ण वार्षिक कार्यक्रमांपैकी एक बनला आहे. वैयक्तिक उपयोग, सणावार, लग्न किंवा कॉर्पोरेट गरजांसाठी येथे प्रत्येकासाठी काहीतरी खास उपलब्ध आहे.
इशान्या फाउंडेशन विषयी
इशान्या फाउंडेशन समुदायांना कौशल्यविकास, उपजीविका समर्थन आणि शाश्वत विकासाद्वारे सक्षम करण्याचे कार्य करते. यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा हा त्यांचा प्रमुख उपक्रम असून सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक उत्सव यांचा सुंदर संगम घडवितो.



