Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeउत्तर-महाराष्ट्रमान्यवरांमध्ये रमणारे व्यक्तिमत्त्व; रामदास नागवंशी

मान्यवरांमध्ये रमणारे व्यक्तिमत्त्व; रामदास नागवंशी

२२ फेब्रुवारी रोजी रामदास नागवंशी यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने लेख……

पदमाकर देशपांडे

नाशिकमधील रामदास भास्करराव नागवंशी हे नाव शहरातील बहुतेकांना माहिती झालेले आहे. महात्मा गांधी रोड तसेच मेनरोड, जुने नाशिक परिसरात जीवन गेलेले नागवंशी हे चित्रपट अभिनेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये रमणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. भरपूर बोलका स्वभाव, सहकार्यशील वृत्ती आणि प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत हसतमुखाने जगण्याची त्यांची शैली अनेकांना अनुकरणीय आहे. त्यांना आपले वडील कैलासवासी भास्करराव मार्तंडशेठ नागवंशी यांचा समृद्ध टेलरिंगचा वारसा मिळालेला आहे. त्या पुण्याईवर तसेच क्रिकेट अंपायर व पत्रकारिता जनसंपर्क यांच्या माध्यमातून नागवंशी यांनी अपार लोकप्रियता संपादन केली आहे. रामदासजींचा जन्म २२ फेब्रुवारी१९५७चा. लौकिकदृष्ट्या त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतल्यावर पुढे जीडी आर्ट कोर्स करून चित्रकलेत प्रावीण्य संपादन केले. महात्मा गांधी रोड वर असलेले वडिलोपार्जित भास्करराव ब्लाउज स्पेशालिस्ट टेलरिंगचा व्यवसाय त्यांनी इमानदारीने जोपासला. नाशिकमध्ये १९२० पासून भास्करराव यांचे नाव ब्लाऊज स्पेशालिस्ट म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात प्रसिद्ध होते. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्याकडे ब्लाउज शिवण्यासाठी येत असत. अभिनेत्री नूतन तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यादेखील त्यांच्या दुकानात व घरीदेखील येत असत. महात्मा गांधी रोडवरील त्यांचे टेलरिंग शॉप म्हणजे चित्रपट-नाट्य कलावंतांच्या भेटीगाठी,गप्पा यांचा अड्डा म्हणून प्रसिद्ध होता. अनेक मान्यवरांनी त्यावेळी तेथे भेट दिलेली आहे. यामध्ये जुन्या जमण्यातील राजा गोसावी, राजा परांजपे यांच्यासारख्या कितीतरी दिग्गजांच्या नावांचा समावेश करता येईल. नाशिक शहरातील नाट्य प्रेमी देखील त्यांच्याकडे येत असत. लता मंगेशकर यांनी इंदूर येथून भास्करराव यांना पाठवलेले पत्र आज देखील रामदास नागवंशी यांच्या संग्रहात आहे. रामदासजी यांनी १९७८ नंतर वडिलांना मदत करण्यास प्रारंभ केला. तोपर्यंत चित्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक संपादन केला होता. अर्थात त्यांनी नियमित टेलरिंग काम १९८० नंतर सुरू केले असले तरी १९७४ मध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटात काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री नूतनसाठी ब्लाउज शिवून देण्यात वडिलांना मोठी मदत केली होती. तर १९९२ मध्ये माजी मंत्री बबनराव घोलप यांनी काढलेल्या ‘नीलांबरी’ या चित्रपटासाठी काम करणारी अभिनेत्री चिन्मयी सुर्वेसाठी खास खणाचे ब्लाऊज देखील स्वतः रामदास नागवंशी यांनी शिवले होते. आपले टेलरिंगचे काम करीत असताना रामदास नागवंशी यांनी जेसिज इंटरनॅशनल क्लबचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या नंतर १९८० पासून जायण्टस ग्रुपचे पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून १४ वर्ष कार्यरत राहिले. या सामाजिक संस्थांतून काम करताना त्यांना विपुल अनुभव मिळाला, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. हे करत असतानाच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून ते काम करू लागले आजतागायत त्यांचे हे कार्य सुरू आहे. त्यानंतर २०१० पासून त्यांनी सक्रिय पत्रकारितेत प्रवेश केला. प्रारंभी काही साप्ताहिकांचे काम केल्यावर प्रसिद्ध दैनिक पुण्यनगरी आणि भ्रमर या सुप्रसिद्ध सायंदैनिकाचे प्रतिनिधी म्हणून ते काम करू लागले. आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे त्यांनी प्रचंड लोकप्रियता संपादन केली. चित्रपट, नाट्य, क्रीडा, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी अनेकांशी मैत्री केली व नाव कमावले. आज वयाची ६२ वर्षे पूर्ण होत असताना ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कार्याचा लाभ अनेकांना मिळत आहे. त्यांचे कौटुंबिक जीवन समाधानी असून पत्नी आणि तीन विवाहित मुली यांच्या सहवासात तसेच मित्र मंडळींच्या गराड्यात त्यांचा काळ व्यतीत होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भावी जीवनात त्यांना सर्व क्षेत्रात भरभरून यश मिळो, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच परमेश्वरकडे प्रार्थना.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!