भूपाल पंडित
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा जबरदस्त माहोल निर्माण झालेला आहे,याच दरम्यान ग्रामीण भागातील राजकारणाची पार्श्वभूमी असलेला ‘कागर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मकरंद मानेचा हा चित्रपट फक्त राजकीयपट म्हणूनच नाही तर तीन वर्षापूर्वी आलेल्या ‘सैराट’ मधून आपल्या दमदार अभिनयाने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातलेल्या आणि घराघरात पोहचलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरू मुळेही चर्चेत आहे.
‘कागर’ या चित्रपटाची कथा प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख ऊर्फ राणी (रिंकू राजगुरू) भोवती फिरणारी आहे. राणी आणि युवराज (शुभंकर तावडे) यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, युवराज हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून आपल्या गावातील शेतकर्यांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेने राजकरणात आला आहे, राणीचे वडील (शशांक शेंडे) हे स्थानिक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असून त्यांना गुरुजी म्हणून ओळखले जाते. युवराज त्यांचा खास कार्यकर्ता आहे, दरम्यान विधानसभा निवडणुक जवळ आलेली असल्याने गावात राजकीय वातावरण जोरदार तापलेले आहे,अशात आबासाहेब (सुहास पाळाशीकर) आणि गुरुजी मधील राजकीय ताणव वाढत जातो. या सर्व परिस्थितीत युवराज आणि राणीच्या प्रेमाचे काय?वर्चस्व अबाधित राखण्याची ही राजकीय स्पर्धा कोणत्या थराला पोहचते?आशा प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘कागर’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.
दिग्दर्शक मकरंद माने यांनी यापूर्वी “रिंगण’, ‘यंग्राड’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत, यामुळे निश्चितच ‘कागर’ बद्दल मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या आणि त्या पूर्ण करण्यात मकरंद यशस्वी झाला आहे. मराठी चित्रपटातून फार कमी वेळा राजकारणाला हात घातला जातो, मकरंदने मोठ्या धाडसाने हा विषय परफेकटली हाताळला आहे. चित्रपट राजकीय असला तरी राणी आणि युवराज यांची प्रेमकथाही तितकीच महत्वाची आहे. महिला प्रधान असा कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता आजच्या मुलीची कथा दिग्दर्शकाने दाखवली आहे, उत्तमा कथा, त्यावर प्रभावी पटकथा आणि दमदार संवाद यामुळे प्रेक्षक कथेशी एकरूप होतो. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेम पासून निर्माण झालेली उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते, ग्रामीण राजकारणातील बारकावे नेमकेपणाने मांडण्यात आले आहेत.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगयाचे तर मध्यवर्ती प्रियदर्शनी ही व्यक्तिरेखा रिंकुने उत्तम साकारली आहे, आर्ची आणि राणी ग्रामीण भागातील असल्या तरी पुर्णपणे वेगळ्या आहेत, यामुळे तिच्या या दोन भूमिकांची तुलना न केलेली बरी, घरात राजकारण असले तरी त्याच्याशी थेट संबध न आलेली राणी जेंव्हा राजकीय मैदानात उतरते तेंव्हा ती पुर्णपणे वेगळी आहे, हे वेगळेपण दाखवण्यात रिंकू यशस्वी ठरली आहे. शुभंकरच युवराज लक्षात राहणारा आहे, शशांक शेंडे नेहमीप्रमाणे उत्तम आहेत, सुहास पळशीकर,विठ्ठल काळे, भारती पाटील यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
चित्रपटाला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत आहे. चित्रपतातील गाणी उत्तम आहेत, कथेला अनुसरून गाणी आहेत मात्र शेवटचे गाणे टाळले असते तर कथा अधिक प्रभावीपणे पुढे गेली असती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘कागर’ बद्दल एकंदरीत सांगायचे तर मकरंद माने, रिंकू राजगुरू यांचे चहाते तुम्ही असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे, शिवाय आजच्या राजकीय वातावरणात एक चांगला राजकीयपट म्हणून, तसेच उत्तम अभिनय, संगीत,वेगळा विषय यासाठी ‘कागर’ हा चित्रपट तुम्ही बघू शकता, थोडक्यात हा चित्रपट म्हणजे राजकीय पटलावर नव्या विचारांचा अंकुर अर्थात ‘कागर’होय.
चित्रपट – कागर
निर्मिती – सुधीर कोलते, विकास हांडे
दिग्दर्शक – मकरंद माने
संगीत – ए. व्ही. प्रफुल्लचंद्र
कलाकार – रिंकू राजगुरू, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, उमेश जगताप, भारती पाटील
रेटिंग – ***
– भूपाल पंडित