वानवडीत ओढ्याच्या दुर्गंधीने रहिवासी बेहाल……

808
वानवडी प्रतिनिधी,
भैरोबानाला हा पुणे शहरातील सर्वात मोठ्या नाल्यापैकी एक असून मोठ्या प्रमाणावर मैलापाणी या नाल्यातून वाहत आहे. वानवडी ते पुढे कोरेगाव पार्क येथील नदीपर्यंत जवळपास ७ ते ८ कि.मी चा असलेला हा ओढा पुणे कँन्टोमेंट लष्कर विभाग व महानगरपालिकेच्या हद्दीवर असल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर तो साफ करण्याची आठवण प्रशासनाला येते खरी पण तो साफ करणार कोण हा प्रश्नच असतो. 
पूर्व भागात असलेल्या भैरोबानाल्याच्या स्वच्छतेकडे दोन्ही प्रशासनाचे दरवर्षी पावसाळ्या अगोदर तो साफ करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे ओढ्याच्या शेजारी असलेल्या वस्ती व इमारती मधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 
महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हद्दीतील नाला ते दरवर्षी साफ करत असतात परंतु आत्ता पर्यंत फक्त पावसाळा तोंडावर आलातरच नालेसफाई, गटारे साफ करण्याचे आदेश दिले जातात त्यावर नाला साफसफाईसाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो पण प्रत्यक्षात फक्त दिखाव्यासाठी कोठे तरी नालासफाईसाठी उपकरणे ओढ्यात उतरवून ओढा साफ करताना दाखवले जाते परंतु पुर्ण ओढा आजपर्यंत साफ झालेला दिसत नाही.
ऐकीकडे पुणे महानगरपालिकेकडून ओढा साफ करण्याचा दिखावा होत असतो तर पुणे कँन्टोमेंट लष्कर विभागाकडून हा ओढा कधी साफ करताना दिसत नाही त्यामुळे या दोन प्रशासनाच्या वादात वानवडीतील ओढ्याच्या शेजारी इमारती, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना या ओढ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा, डासांचा त्रास सहन करावा लागत असून आरोग्यधोक्यात घालून रहावे लगत आहे. 
सर्वात मोठ्या ओढ्यातील मैलापाण्यात मोठ्या प्रमाणावर घाण वाहून येत असते त्यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक, झाडांचा पालापाचोळा तसेच कचरा मोठ्या प्रमाणावर साचून रहात असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन दुर्गंधी पसरत असते त्यामुळे फक्त पावसाळ्यातच नव्हे तर दर सहा महिन्यांनी ओढे, नाले, गटारे साफ झाली पाहिजेत. 
वानवडीतील पश्चिम दिशेला असलेल्या भागातील शंकर महादेव मंदिरामागे, चौघुले मळा, होलेवस्ती, इनामदार दवाखाना या भागातून वाहत असलेला ओढ्यात मोठ्या प्रमाणावर घाण असल्याचे दिसून येत आहे. त्यात नाला साफ करणारी उपकरणे काही ठिकाणी ओढ्यात उतरवणे कठीण असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे करत नाला सफाई होत नाही त्यामुळे यंदा तरी पुर्ण ओढा कँन्टोमेंट आणि महानगरपालिके कडून साफ होईल का असा प्रश्न नागरिक करित आहेत.