मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे वटवृक्षांचे रोपण

518

यंदा जाळीसह पाच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट

पिंपरी, प्रतिनिधी :

वटपौर्णिमेनिमित्त मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती,पिं.चिं.शहर आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समिती यांच्या संयुक्तपणे वटवृक्षांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, वृक्षारोपणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, या अंतर्गत यंदा पाच हजार झाडे
लावण्याचा संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी केला आहे.
पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याला सुरुवात करण्यात आली असून, याची सुरुवात पिंपळे गुरव येथून करण्यात आली. ‘कराल वृक्षावर माया, मिळेल थंडगार छाया’, अशी भावना ठेवून वृक्षारोपण करण्यात आले. येत्या काही दिवसात या अभियाना अंतर्गत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे जाळीसह झाडे लावण्यात येणार असून, या पाच हजार वृक्षाचे संगोपनही करणार आहोत. जेव्हा वृक्षांना पाण्याची गरज भासेल तेव्हा पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले, की गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, पाऊस कमी झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला भोगावे लागत लागत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी तर जनावरांना चारा मिळत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड हेच आहे. या सर्व गोष्टीचा गांभिर्याने विचार करून गेल्या सात वर्षापासून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. तसेच फक्त वृक्ष लागवड न करता त्या वृक्षांचे संगोपन करण्याचे काम आम्ही करत आहोत. यावर्षी सुमारे पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा आमचा संकल्प आहे, असेही अरुण पवार यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका उषाताई मुंढे, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, आण्णा जोगदंड, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, प्रकाश बंडेवार, मल्हारराव येवले, पंडित वनसकर, राहुल शेडगे, एल्लापा पौगुडवाले, ईश्वर सोनेने, सचिन सांगवे, रविंद्र सुरवे, कामगार कल्याण संचालक प्रदिप बोरसे आदी उपस्थित होते.