Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीमतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 23: राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या दि. 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. एका मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबल साठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात. व्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएम वरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बरकोडद्वारे इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम ने आन करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

*मंत्रालयात एलईडीवर निकाल प्रदर्शित करणार*

मंत्रालयात निकालाची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने व्यवस्था केली आहे. मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या एलईडी स्क्रीनवरही निकाल प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच ‘Voter Helpline’ या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड ऍपवर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.

000

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!