मराठी चित्रपटसृष्टीची मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याची क्षमता

690

मुलींच्या जीवनावर आधारित ‘गर्ल्स’ हा चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून याची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. नरेन कुमार यांची निर्मिती असलेला हा दुसरा मराठी सिनेमा आहे. ‘चुंबक’ सारख्या सुजाण आणि संवेदनशील कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर नरेन कुमार यांनी ‘गर्ल्स’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘गर्ल्स’ या नवीन चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. नरेन कुमार म्हणाले, “मला मनोरंजनात्मक चित्रपट पाहायला आवडतात. त्यामुळे मला मास एन्टरटेनिंग चित्रपटाची निर्मिती करायची होती. याआधी मी काही हिंदी चित्रपटांसाठी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पहिले आहे. ज्यामध्ये जॉली एल.एल.बी टू, सोनू के टीट्टू की स्वीटी यांच्यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता एका हिंदी चित्रपटाचीही निर्मिती करत आहे. मराठी चित्रपटांची  निर्मिती करण्यामागे एक विशेष कारण होते. ते म्हणजे, सध्या  मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक चांगले चित्रपट येत आहेत. या क्षेत्रात आल्यापासूनच मराठी चित्रपटांची निर्मिती करण्याची माझी इच्छा होती. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ला सिद्ध करायला खूप वाव आहे, असे मला वाटते. ‘चुंबक’ सारख्या सुंदर चित्रपटातून मी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘चुंबक’च्या यशानंतर मला पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु  यावेळी मला एखादा वेगळा आणि मास एन्टरटेनिंग चित्रपट करायचा होता. माझ्या डोक्यात एक कल्पना होती, मराठी सिनेसृष्टीमध्ये आतापर्यंत मुलींच्या आयुष्यावर आधारित चित्रपट फार कमी आहेत. माझ्या मते ‘बिनधास्त’ हा पहिला आणि अखेरचा चित्रपट असेल, जो मुलींच्या जीवनावर आधारित होता. त्यानंतर असा मुलींच्या जीवनावर आधारित चित्रपट आलेलाच नाही. त्यामुळे मनात कुठे तरी अशा काहीशा विषयावर चित्रपट करण्याची इच्छा जागृत झाली. योगायोगाने ‘बॉईज २’ च्या चित्रीकरणादरम्यान माझी आणि विशालची भेट झाली होती.  त्यावेळी विशाल सहज म्हणाला, या चित्रपटानंतर मी मुलींच्या जीवनावर आधारित सिनेमा करण्याचा विचार करतोय. तेव्हा मी सुद्धा विशालला बोललो, गेले काही दिवस हाच विचार माझ्या मनात सुद्धा सुरु आहे. त्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु केले. यात लेखक हृषिकेश कोळी यांनी खूप बारकाईने काम केले आहे.
हा चित्रपट का पाहावा याबद्दल नरेन सांगतात,  हा चित्रपट पाल्य -पालकांनी एकत्र पाहावा असा आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. अनेक कुटूंबामध्ये पालक आणि मुलांमध्ये काही गैरसमज निर्माण होतात. आणि हा चित्रपट पहिल्यानंतर मुलांना आपल्या पालकांच्या आणि पालकांना मुलांच्या भावना समजून घेणे सोपे जाईल आणि हे गैरसमज आपोआप दूर होतील.”
‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.