पुणे प्रतिनिधी,
शिकलगर समाजाच्या उत्कर्षासाठी पुढे आलेल्या बच्चूसिंग टाक या युवकाने आजवर शेकडो लोकांचे प्राण वाचवले असून पोलीस व प्रशासनाला मदत करण्यात पुढाकार घेतला आहे, बच्चूसिंग टाक या धाडसी युवकाला मात्र अद्याप शासनाच्या कोणत्याही सुविधा मिळाल्या नसल्यामुळे समाज रक्षणासाठी पुढे येणाऱ्या युवकांना शासनाकडून न्याय मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
पूर्वी राजे महाराजांना हत्यारे व तलवारी बनवून देणारा शिकलगर समाज राजेशाही अस्त झाल्यानंतर कालांतराने रोजीरोटी व कामधंद्याच्या निमित्ताने भटकत होता अनेक वर्षांपूर्वी शिकलगर समाजाच्या पिढ्या महाराष्ट्रात आल्या पुणे शहर व हडपसर परिसरात भटकंती करत असताना या ठिकाणी स्थायिक झालेली अनेक कुटुंबे आता विविध व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत.
शिकलगर समाजातील युवक बच्चूसिंग टाक यांनी आपलं कुटुंब सांभाळत सामाजिक ऋण लक्षात घेऊन विविध उपक्रम सुरु केले व शेजारीच मोठा कालवा असल्याने आजवर पाण्यात बुडताना शेकडो लोकांचे प्राण वाचवले तसेच अनेक मृतदेह काढण्यास पोलिस प्रशासनाला मदत केली आहे.
बच्चूसिंग टाक त्यांची मुले भगतसिंग, आझादसिंग, पुतणे युवराजसिंग, राजू सिंग यांनी हा पायंडा पुढे चालू ठेवला आहे.
कोणतीही आपत्कालीन घटना घडली पोलीस प्रशासनाला बच्चूसिंग व त्याच्या कुटुंबाची आठवण येते व युवक तातडीने जाऊन मदतीचा हात पुढे करतात. प्रसंगी जीव धोक्यात घालतात.
आपत्कालीन घटनेमध्ये पुढाकार घेत असताना रात्री-अपरात्री कोणतीही वेळ न पाहता बच्चूसिंग व त्याच्या कुटुंबाने समाजातील अनेकांना जीवदान दिले असले तरी शासनाने मात्र त्यांच्या कार्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे .
खाजगी संस्थां व महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने बच्चूसिंग ला सन्मानित केले असले तरी शासनाकडे मागणी करूनही आजवर त्यांची जीवरक्षक म्हणून नेमणूक केलेले नाही तसेच कोणत्याही शासकीय सुविधा दिल्या नसल्यामुळे अनेकांना मदत करणाऱ्या व्यक्तीची शासनाला गरज नाही का असा प्रश्न निर्माण होतो.
बच्चूसिंग व त्याची मुले यांचे आपत्कालीन कार्य लक्षात घेतात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जीवरक्षक म्हणून नेमणूक करावी व शासनाच्या सर्व सुविधा, मानधन द्यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे शासन याकडे लक्ष देऊन या जिगरबाज कुटुंबाला न्याय देणार का हा सवाल अनुत्तरित आहे.