Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेडॉ.रोहन कुलकर्णी जागतिक स्तरावरील “स्टेम सेल्स तरुण संशोधक” पुरस्काराने सन्मानित

डॉ.रोहन कुलकर्णी जागतिक स्तरावरील “स्टेम सेल्स तरुण संशोधक” पुरस्काराने सन्मानित

पुणे प्रतिनिधी

: स्टेम सेल्स अर्थात मूळ पेशींवर संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना दिला जाणारा जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अवॉर्ड (तरुण संशोधक पुरस्कार) यावर्षी डॉ. रोहन कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.

डॉ. रोहन कुलकर्णी यांना त्यांच्या रक्त निर्माण करणाऱ्या मूळ पेशींवरील अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रशस्तीपत्रक व दहा हजार डॉलर्स असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार व्हीले पब्लिशिंग हाऊस व अल्फा मेड प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. जागतिक पातळीवर महत्त्वाचे ठरलेले हे संशोधन डॉ.रोहन कुलकर्णी यांनी पुणे स्थित राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) येथे केले आहे.

शरीरातील मूळ पेशींवरील संशोधन कार्यासाठी वाहिलेल्या स्टेम सेल्स या नामांकित नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या शोध निबंधाचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शरीरामध्ये रक्त निर्मितीचे महत्वाचे कार्य रक्ताच्या मूळ पेशी करत असतात. या पेशींचा उपयोग कर्करोग व इतर दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. वृद्ध लोकांमधील या पेशींची कार्यक्षमता कमी असल्याने उपचारांसाठी त्या निरूपयोगी ठरतात. पुनरुज्जीवनाद्वारे मूळ पेशींकरता अधिक दाते उपलब्ध करून अधिकाधिक गरजु रुग्णांना उपचार मिळावे असे सदर संशोधनाचे उद्दिष्ट होते. या मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे.

डॉ. रोहन कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण दौंड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथे संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त केली आहे. यानंतर ते पुढील संशोधनाकरिता फ्रान्स येथे होते, तर सध्या ते अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये आपले संशोधन करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!